लिंकरोड प्रकरणी तुळसकरवाडीतील शेतकरी महिला आक्रमक : शेतकाऱयांचे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आश्वासने ठरली फोल
वार्ताहर / धारगळ
दोन ते तीन वर्षांपूर्वी पेडणे तालुक्मयात मोपा पठारावर आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार या घोषणेचे सर्व पेडणेवासियांनी स्वागत केले होते. सर्वांनीच आनंदोत्सव साजरा केला. येथील शेतकऱयांनी स्वखुशीने आपल्या शेतजमिनी विमानतळासाठी अल्प मोबदल्यात दिल्या. काही शेतकऱयांना मोबदला मिळाला तर काहीजण त्याची वाट पहाट आहेत. राजकर्त्यांनीसुद्धा या भागातील जनतेला खोटी आश्वासने देऊन झुलवत ठेवले. व आता परत एकदा सरकारने धारगळ महामार्ग ते मोपा विमानतळपर्यंत आठ किलो मीटर लांबी वा सरासरी ऐशी मिटर रुंदीचा रस्ता करण्याचा संकल्प केलेला आहे. या आठ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी जी शेतजमीन जात आहे, त्याठिकाणी लोक मोटय़ा प्रमाणात भात शेती, ऊस बागायती, काजू बागायती इत्यादी पिके घेतात. जर ही शेतजमीन पूर्णपणे आपल्या हातातून गेली तर आपले अस्तित्वच नष्ट होईल. भविष्यात आपण खायचे काय? आपला संसार करायचा कसा? पुढच्या पिढीला कुठली जमीन ठेवायची? अशा स्वरुपाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्या गरीब शेतकऱयांसाठी अनुत्तरीतच आहेत. याबाबत शेतकऱयांची संभ्रमावस्था झाली आहे. त्यामुळेच जे सरकारी अधिकारी सर्वे करायला येतात त्यांना तीव्र विरोध करून त्यांच्यावर शेतकरी तुटून पडतात. त्यांना शिव्या-शाप देतात. मागच्या दोन दिवसांतही तेच झाले. सर्वेच्या शेवटच्या टप्प्यात सोमवारी सरकारी अधिकारी तुळसकरवाडी येथे पोचले असता पुन्हा एकदा शेतकऱयांनी त्यांचावर हल्लाबोल केले. शेकडो शेतकरी ते आपल्या काजू बागायतीमध्ये ठाण मांडून बसले होते, यात महिलांचा भरणा अधिक होते. आमची जमीन देणार नाही, मोपा विमानतळ रद्द करा, अशा घोषणा देत त्यांनी सर्वे करायला विरोध केला. यावेळी सरकारविरुद्ध व खास करून स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या. टायर्स पेटवून रस्ता अडवण्यात आला. सर्वे करायला आलेल्या कामगारांना व अधिकाऱयांना हाकलून लावण्यात आले. अधिकारी आणि शेतकरी यांच्यात शाब्दीक चकमकी उडाल्या.
काही महिला चक्कर येऊन कोसळल्या
या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग होता. आमच्या शेतजमीनी आम्ही कदापिही देणार नाही, असा आक्रोश करत तहानभूक विसरून घोषणा देत होत्या. आंदोलन करीत होत्या. काही महिलांना चक्कर येऊन खाली पडल्या. त्यांना सोबत असलेल्या शेतकरी महिलानी त्यांना शुद्धीवर आणले.
बाबू आजगावकरांविरोधात तीव्र भावना
येथील स्थानिक आमदार तथा राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू अजगावकर यांच्यावरही महिलांनी तोंड सुख घेतले. मते मागण्यासाठी सतत आपल्या वाडय़ावर, घरामध्ये पाया पडून मते मागणारा हा आमचा सेवक व नोकर आता कुणाची सेवा करण्यात दंग आहे, असा प्रश्न महिलांनी यावेळी केला. या पुढे बाबू अजगावकरांना तुळसकरवाडीमध्ये मते मागण्यासाठी आल्यास विरोध केला जाईल, असे शेतकऱयांनी सांगितले.
वरणभाताचे वन भोजन जेवण
पहिल्या दिवशी दुपारी एक वाजेपर्यंत तहानभूक विसरून आंदोलनकर्ते शेतकरी घोषणा देत आंदोलन करीत होते. ऐंशी वर्षांच्या वृद्ध महिलांसह लहान मुलेही आंदोलनात सहभागी झाली होती. शेवटी कुणी तरी वरणभात करून जेवण्याचा प्रस्ताव मांडला व सर्वांनी तसे वनभोजन जेवण केले.
भूसंपादन अधिकाऱयाला धरले धारेवर
सर्वेच्या शेवटचा दिवशी संध्याकाळी भूसंपादन अधिकारी शेतकरी महिला शेतकऱयांच्या तावडीत सापडले. महिलांनी संबंधित अधिकाऱयाला धारेवर धरले. या दरम्यान एक महिला व्हिडिओ रेकॉर्डिंग करीत असताना एका पोलीस शिपायाने लाठी मारून तिचा मोबाईल खाली पाडला, त्यामुळे तो हरवला. आपला मोबाईल द्या तोपर्यंत तुम्हांला इथून जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेऊन महिलांनी त्यांना अक्षरशः घेराव घातला. शेवटी पोलिसांची जादा कुमक बोलावून त्यांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली.
आंदोलनाची धार तीव्र होण्याची शक्यता
मोपा लिंक रोडला जो विरोध करण्यासाठी शेतकाऱयांनी सुरू केलेले आंदोलनाची तीव्र होण्याची शक्यता आहे. शेतकऱयांनी ज्याप्रकारे सरकार तसेच उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे, त्याचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येतील. ज्या मोपाचे भांडवल करून काही जण निवडणुक जिंकण्याची स्वप्ने पहात आहेत, तोच मोपा विमानतळ प्रकल्प त्यांच्या पराभवाचे कारण ठरू शकतो, अशा भावना शेतकऱयांतून व्यक्त होत आहेत..









