भाजपची हास्यास्पद कार्यपद्धती : आप नेते वाल्मिकी यांची जोरदार टीका
प्रतिनिधी /पणजी
बाबूश मोन्सेरात यांना पणजीची उमेदवारी देताना भाजपने त्यांच्या काँग्रेस आमदारकीचा निकष लावला असून काँग्रेसमधील त्यांच्या विजयाचे श्रेय भाजप लाटत आहे. हा प्रकारच हास्यास्पद आणि उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी नाकारणाऱया भाजपसाठी शरमेची बाब असल्याची जोरदार टीका आप नेते वाल्मिकी नाईक यांनी केली आहे.
रविवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने भाजपने रविवारी प्रत्येक उमेदवाराच्या फौजदारी खटल्यांचे तपशील त्यांच्या अधिकृत वेबसाइटच्या मुख्यपृ÷ावर प्रकाशित केले आहेत. त्यात पणजीतील उमेदवाराच्या पात्रतेच्या वर्णनात, ’बाबूश हे एक ज्ये÷ राजकारणी आहेत व त्यांनी अनेक वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्यांना पणजीच्या वास्तविकतेची पूर्ण माहिती आहे’, असे म्हटले आहे.
भाजपचा हा दावा खोडून काढताना वाल्मिकी यांनी, ’बाबूश हे एकदाच पणजीत काँग्रेसच्या तिकिटावर जिंकले होते व नंतर त्यांना भाजपने विकत घेतले होते’, याची आठवण करून दिली. बाबूश यांनी अनेकवेळा प्रतिनिधित्व केलेले मतदारसंघ पणजी नव्हे तर ताळगाव व सांताक्रूझ हे होते? तोच निकष लावत भाजपने त्यांना पणजीची उमेदवारी दिली आहे का? असा सवाल उपस्थित करून वाल्मिकी यांनी भाजपवर टीकेची झोड उठविली.
गुन्हे नोंद नसलेल्या स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तींना उमेदवारी का दिली नाही? अशी विचारणा निवडणूक आयोगाने इतर पक्षांकडे केली आहे. त्यावर भाजपने स्पष्टीकरण देताना, मतदारांच्या आकांक्षा पूर्ण करेल याचा विश्वास असलेल्यांनाच उमेदवारी दिली असल्याचे म्हटले आहे, अशी माहिती वाल्मिकी यांनी दिली.
भाजपचा हा खोटारडेपणा उघड करताना वाल्मिकी यांनी, बाबूश हे मतदारांच्या ’आशा-आकांक्षांचे’ प्रतिनिधित्व करत नाहीत हे आता प्रत्येकाच्या लक्षात आले आहे. गत वेळी त्यांनी भरमसाठ आश्वासने देऊन मतदारांची फसवणूक केली. 100 दिवसात पॅसिनो हटविणार म्हटले होते, ते पॅसिनो आजही मांडवीत दिमाखात उभे आहेत. त्याशिवाय घरोघरी रोजगार देण्याचेही आश्वासन दिले होते, परंतु ते पूर्ण केले नाही, असे वाल्मिकी म्हणाले.









