असदुद्दीन ओवैसी यांचे विधान ः धर्मनिरपेक्ष पक्षांसाठी मी अस्पृश्य
पश्चिम बंगालच्या राजकीय संग्रामात एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीनीही एंट्री केली आहे. एआयएमआयएम येथे अनेक मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवत असून ओवैसी यांनी स्वतः प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. माझी लढाई ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी दोघांसोबत असल्याचे ओवैसी यांनी स्पष्ट केले आहे.
आम्ही केवळ 6 जागांवर निवडणूक लढत आहोत. ही आमची सुरुवात असून आमच्या पक्षासाठी बंगालमध्ये चांगला वाव असल्याचा आमचा विश्वास आहे. आमच्या निशाण्यावर पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी दोघेही आहेत. आम्हाला तडजोड करता येत नाही, लढता येते असे ओवैसी म्हणाले.
धर्मनिरपेक्ष पक्ष मला अस्पृश्य मानतात, माझ्यासोबत आल्याने त्यांच्या हातातून बहुसंख्याकांची मते निसटतील असे त्यांना वाटते. सद्यकाळातील राजकारणात सर्वात मोठा हिंदू कोण आहे दर्शविण्याची शर्यतच लागली आहे. प्रचारसभांमध्ये मुस्लीम हा शब्द ऐकूच पडत नाही. ममता बॅनर्जींना आपण ब्राह्मण असल्याचे सांगावे लागत आहे, तामिळनाडूतही असाच प्रकार घडत आहे, बंगालमध्ये चंडीपाठ केला जात असल्याचे ओवैसी म्हणाले.
ममता बॅनर्जी यांनी हिंदूंना एकजूट करण्याबद्दलही बोलायला हवे होते, त्यांनी मुस्लिमांसाठी काहीच काम केले नाही, केवळ देखाव्याचे काम केले आहे. ममता बॅनर्जी स्वतःला मोदींपेक्षा मोठा हिंदू ठरवू पाहत आहे, तर पंतप्रधान मोदी स्वतःला हिंदू राष्ट्रवादी सिद्ध करू पाहत असल्याचा दावा ओवैसी यांनी केला आहे.
जुल्फिकारची मोदींनी भेट घेतली असली तरीही हे एकतर्फी प्रेम आहे. भाजपने मग जुल्फिकारला बंगाल किंवा गुजरातमधून तिकीट द्यावे आणि जिंकू द्यावे. बंगालमध्ये आजही मुस्लीम लोकसंख्येची स्थिती खराब असून याकडे कुणीच लक्ष दिलेले नाही. मुस्लिमांची कुठलीच मतपेढी नव्हती, मुस्लिम मतदारांना ठेंगा दाखविण्यात आल्याचे ओवैसी म्हणाले.
भाजपचा एकही खासदार मुस्लीम का नाही, गुजरातमध्ये अखेरचा मुस्लीम खासदार कधी विजयी झाला होता? आम्ही गुजरातच्या गोध्रामध्ये भाजपचा महापौर होऊ दिला नसल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे.









