पुणे \ ऑनलाईन टीम
केंद्र सरकारने जनतेवर लादलेल्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून डिजिटल आंदोलन करण्यात आले आहे. ‘#मोदी मतलब महंगाई’ हा हॅशटॅग वापरत राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला आहे तसेच हा हॅशटॅग वापरत आपल्या भावना व्यक्त करण्याचे आवाहन देखील राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंबंधी माहिती दिली आहे. रूपाली चाकणकर यांनी एकापाठोपाठ एक ट्वीट करत वाढत्या महागाईचा निषेध केला आहे.
रूपाली चाकणकर यांनी ‘पेट्रोल दराची शंभरी गाठणारे पहिले पंतप्रधान मोदी !’, ‘मागून झाली मतं, महाग केली खंत’, ‘नुस्ती दाढी नाही वाढवली त्यासोबत महागाई सुद्धा वाढवली’, अशा टॅग लाईनची विविध पोस्टर ट्वीटरवर व फेसबुकवर शेअर केली आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.









