गुजरात दौऱयात दोन दिवस भरगच्च कार्यक्रम : कोरोना काळातील पहिलाच गुजरात दौरा :17 कार्यक्रमांचे आयोजन
वृत्तसंस्था/ केवडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱयावर असून त्यांनी शुक्रवारी येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळय़ानजीकच्या चार नव्या प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केले आहे. त्यात 17 एकर भूमीत विस्तारलेल्या आरोग्य भवन या बहुउद्देशीय आरोग्य सुविधा प्रकल्पाचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी 5 लाख वृक्षांची लागवड करण्यात आलेल्या बगिचा प्रकल्पाचे आणि योग केंद्राचे राष्ट्रार्पण केले.
शुक्रवारी त्यांच्या हस्ते एकता पुतळय़ाच्या परिसरातील एकता मॉलचेही उद्घाटन करण्यात आले. या मॉलमध्ये पर्यटकांना विविध प्रकारच्या हातमाग निर्मिती वस्तू खरेदी करता येणार आहेत. 35 हजार चौरस फूट भूमीत विस्तारलेल्या या दोन मजली हस्तव्यवसाय वस्तू मॉलमध्ये गुजरातसह भारतीय कारागिरांनी तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री यांची सोय करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे हस्तव्यवसायाला प्रोत्साहन मिळून कारागिरांना मोठा रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केला.
मुलांसाठी भव्य उद्यान
नंतर पंतप्रधान मोदींनी 47 एकर भूमीवर विस्तारलेल्या भव्य बालक पोषण उद्यानाचे उद्घाटन केले. हा अभिनव प्रकल्प असून तेथे बालकांना आहार आणि पोषकद्रव्यांची माहिती, सकस आहाराचे वापट, सकस आहाराच्या महत्वासंबंधी त्यांचे प्रबोधन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. हे भारतातील अशा तऱहेचे पहिलेच उद्यान आहे. भारताच्या बालकांच्या कुपोषणाची समस्या मोठी आहे. तिच्यावर तोडगा काढण्याचा हा प्रयत्न आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.
या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि गुजरात मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. हा प्रकल्प पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी बराच वेळ दिला. उद्घाटनप्रसंगी या अभिनव कल्पनेचे त्यांनी कौतुक केले.
कोरोना काळातील गुजरात दौरा
कोरोका काळातील हा पंतप्रधान मोदींचा प्रथमच गुजरात दौरा आहे. त्यामुळे त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. याआधी कोरोना काळातच त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष त्या राज्यात जाऊन प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यांचे आणखी दोन बिहार दौरे होणार आहेत.









