नरेंद्र मोदी यांच्या दुसऱया टर्ममधील पंतप्रधानपदाला रविवारी दोन वर्षे पूर्ण झाली आणि मोदींची पंतप्रधान म्हणून सात वर्षे पूर्ण झाली. ही सात वर्षे म्हणजे बिगर काँग्रेसी पंतप्रधानांची जशी सप्तपदी होती तशी ती भाजपा विरोधकांना आणि भारताच्या शत्रू राष्ट्रांना तप्तपदी होती. मोदींनी भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी अथक प्रयत्न केले, करत आहेत. मोदी नावाचा एक ब्रँडच तयार झाला आहे. मोदी भक्त आणि मोदी विरोधक अशी विभागणीपण दिसत आहे. गेले दीड वर्षे अवघ्या विश्वाला कोरोना महामारीचा न भूतो असा तडाखा बसला आहे. कोरोनानंतरही देशात आणि जगात अनेक बदल संभव आहेत. कोरोनानंतरचे जग वेगळे असणार आहे. कोरोनाचा सामना कसा करायचा हे आव्हानही कायम आहे. यातच भर ही राजकारणाची आणि आरोप-प्रत्यारोपाची आणि अपेक्षांची. त्यामुळे रोज राजकीय धुळवड सुरूच असते. प. बंगालमध्ये भाजपाने उत्तम व भव्य यश मिळवले असले तरी बंगालची सत्ता भाजपाला मिळवता आली नाही आणि महाराष्ट्रात शिवसेनेने निवडून आल्यावर शरद पवारांचा हात पकडला म्हणून भाजपाला या दोन राज्यात अपेक्षित गोल करता आला नाही. पण केंद्रातील सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपाची गेल्या सात वर्षातील वाटचाल दमदार आहे. सन 2024 च्या निवडणुकीत काय होणार यांचे वेध सर्वांनाच लागले आहेत. पूर्वीच्या काळात निवडणुकीपुरती निवडणूक व कारणापुरते राजकारण केले जायचे पण गेली काही वर्षे विशेषतः भाजपा सत्तारूढ झाल्यापासून 12 महिने 24 तास राजकारण केले जाते आणि देश संकटात असताना, कोरोना तांडव सुरू असतानाही राजकीय स्वार्थ, आरोप-प्रत्यारोप व सोशल मीडियावरुन टिंगलटवाळी थांबलेली नाही. बंगालची सत्ता ममताने एकहाती राखली. या पार्श्वभूमीवर मोदींना, भाजपाला रोखता येते हा विश्वास विरोधकांना आला आहे. ओघानेच त्यांनी 2024 च्या निवडणुकीत भाजपाला खेचणार असे म्हणत पंतप्रधानपदासाठी मार्केटिंग सुरु केले आहे. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार, देवेगौडा वगैरे नेत्यांची आशा जागली आहे. त्यांचे समर्थक भावी पंतप्रधान म्हणून त्यांचे मार्केEिटग करताना दिसतात. भाजपा विरोधकांनी मोदींच्या बदनामीची मोहीम हाती घेतली आहे. मोदी बदनामीच्या टूलकिटची चर्चा आहे. लालकिल्ल्यासमोरची निर्देशने असोत, विदेशी मीडियातील मोदींची बदनामी असो अथवा कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात पुढे आलेल्या उणीवा असोत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपाविरोधक मोदींना लक्ष्य करत आहेत. राजकारणात हे अपेक्षितच असते. काँग्रेसने तर आज महाराष्ट्रभर मोदी विरोधी निर्देशने व पत्रकार परिषदा यांचा धडाका लावला आहे. मोदींनी मन की बात करत आपला निर्धार व काम सुरू ठेवले आहे. त्यातच या कोलाहलात जे सर्व्हे झाले त्यामध्ये मोदींना पर्याय नाही असेच मत पुढे आल्याने भाजपाचा विश्वास वाढला आहे. मोदींनी आत्मनिर्भर भारतपासून ना खाऊंगा ना खाने दुंगा अशा अनेक घोषणा व योजना जाहीर केल्या पण मोदींची सप्तपदी म्हणून अधोरेखित कराव्यात अशा ज्या सात गोष्टी आहेत. त्यामध्ये नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईक घटनेचे 370 वे कलम रद्द, तीन तलाक पद्धती रद्द, राम मंदिराची कोनशिला, नागरिकत्व सुधारणा कायदा, जीएसटी यांचा उल्लेख करावा लागेल आणि मोदींच्या तप्तपदीमध्ये महागाई, वाढती बेरोजगारी, पुरस्कार वापसी, शाहीनबाग व शेतकरी आंदोलन एनडीएमधील सदस्यांनी सोडलेली साथ आणि एकाधिकारशाहीचे आरोप यांचा उल्लेख करावा लागेल. मोदींची पहिली 5 वर्षे आणि त्यांनी जगभर उजळलेली भारताची प्रतिमा, अमेरिकेशी केलेली मैत्री, भागिदारी, डोकलाम येथे चिनी ड्रगनला रोखण्यात दाखवलेले यश, देशभर उभ्या केलेल्या पायाभूत सुविधा, पाकिस्तान व दहशतवादी संघटनांना सर्जिकल स्ट्राईक करुन दिलेला धडा, राफेल खरेदी, सुराज्य सेना याचे सर्वत्र कौतुक झाले. मोदी मोठय़ा संख्याबळाने निवडून आले आणि आता तर लोकसभा व राज्यसभेत भाजपाचे चांगले संख्याबळ झाले. ओघानेच भाजपाचा वर्षानुवर्षाचा जो अजेंडा होता त्या दिशेने पावले टाकली गेली आणि दुसऱया टर्ममध्ये प्रारंभीच अनेक मूलभूत आणि दीर्घकाळ रेंगाळलेले विषय संपवण्यावर भर देण्यात आला. कोरोना पहिली लाट हाताळण्यात त्यांनी कौशल्य दाखवले. पण दुसरी लाट हाताबाहेर गेली. कोरोना काळात झालेल्या निवडणुका आणि तेथे मोदी-अमित शहा यांनी केलेला प्रचार, पणाला लावलेली प्रतिष्ठा हा टीकेचा विषय झाला. वर्षानुवर्षे सत्ता भोगणारे काँग्रेसजन आणि काही प्रादेशिक पक्ष यांना भाजपा, मोदी आणि मोदींची एकाधिकारशाही नको झाली आहे. वेगवेगळे मुद्दे, सल्ले, किट घेऊन त्यांनी उठाव केला आहे. विदेशी मीडियात मोदींची बदनामी केली जात आहे. संसदेची नवीन इमारत व नवे पंतप्रधान निवास यांना लक्ष्य करून मोदींवर टीका केली जात आहे. कोरोनामुळे सारेच संकटात आहेत तरीही जो सर्व्हे झाला आहे त्यात नरेंद्र मोदींना पर्याय दिसत नाही. आगामी काळात मोदींची तप्तपदी वाढणार आहे. मोदींना व भाजपाला कसोटीत उतरायचे तर नेटाने, निर्धाराने वाटचाल करावी लागेल. कोरोना संकटातही नव्या संधी शोधून देशाला बलशाली करावे लागेल. बेरोजगारी व अर्थव्यवस्था यांना सावरावे लागेल. समान नागरी कायदा हा दीर्घकाळाचा विषय भाजपच्या भात्यात आहे. तर विरोधकांना पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्यापासून विश्वासार्हतेपर्यंत समस्या आहेत. तूर्त मोदींची सप्तपदी पूर्ण झाली आहे. सावधान होऊन त्यांना देशाचा संसार चांगला, लोकहिताचा करायचा आहे.
Previous Articleमुस्लिमांना 80 टक्के शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घटनाबाहय़
Next Article ‘वागले की दुनिया’चे महिला मंडळ करणार नाईट आउट
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








