गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ नरेंद्र मोदी यांनी सात ऑक्टोबर 2001 रोजी घेतली त्या घटनेला आता वीस वर्षे होत आहेत. या काळात फार मोठय़ा लोकसंख्येला आपल्या वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचे गारुड घालत ते दोनदा पंतप्रधान झाले. चहा विकणारा मुलगा ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला त्यांच्या लोकप्रियतेचा उपयोग आपली मते वाढवण्यासाठी करावा असे वाटण्याइतपत त्यांची जागतिक प्रगती आहे. या जीवनाच्या कथा-दंतकथा प्रपोगंडा सर्वकाही देशाला मुखोद्गत आहे. गुजरातच्या दंगलीतून मिळालेली ‘मौत का सौदागर’ ही जहरी उपाधी त्यांचे आयुष्य बदलून गेली आणि भाजप नेतृत्वाची ‘केमोथेरपी’ त्यांच्यासाठीच झाली! 2003 मधील व्हायबंट गुजरात या गुंतवणूक मेळाव्यापासून मोदींनी स्वतःची प्रतिमा विकास पुरुष अशी करण्यास सुरुवात केली. अनेक उपक्रमातून त्यांनी जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले. अर्थात महाराष्ट्रासारखी राज्ये त्या काळातही आघाडीवर होती. मात्र आपल्या यशस्वीतेचे पोवाडे देशातील गणमान्य उद्योजकांकडून गाऊन घ्यायचे जे कसब मोदींनी साधले त्या स्पर्धेत देशातला एकही नेता टिकाव धरू शकला नाही. त्यातून मोदींचे नेतृत्व देशात चर्चेत आले. याच काळात सामाजिक-राजकीय स्थित्यंतर सुरू झाले होते. 2012च्या सुमारास कोळसा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा, निर्भया कांड, लोकपाल विधेयक अशा अनेक कारणांनी वातावरण ढवळून निघाले होते. काँग्रेसची देशावरील पकड पूर्णतः निसटली होती. युवावर्गाला बदल हवा होता आणि त्या बदलाच्या वाऱयात 2004 आणि 2009 ची अडवाणींच्या नेतृत्वाखालची निवडणूक हरलेला भाजप जिंकू शकणार नाही. त्यासाठी नवा चेहरा हवा हे हेरून रा. स्व. संघाने आपला स्वयंसेवक, प्रचारक असलेल्या नरेंद्र मोदींना पुढे आणले. आक्रमक प्रचारशैली, थेट पंतप्रधानांपासून पाकिस्तानपर्यंत प्रत्येकाला आव्हान देणारी बोली, 130 कोटी जनतेच्या ताकदीतून नवा भारत घडवण्याचे स्वप्न आणि त्यासाठी ’सब का साथ सब का विकास’ ही दलित मुस्लिमांसह विविध घटकांना हाक देणारी भाषा याचा परिणाम म्हणून 2014 मध्ये मोदी बहुमताच्या आकडय़ाच्या जवळ पोहोचून सत्तेत आले. यापूर्वीच्या अनेक सरकारांना आघाडय़ांशिवाय सत्ता न मिळाल्याने हे यश म्हणजे मोदी लाट मानले गेले. अर्थातच देशाच्या त्या भारलेल्या वातावरणात मोदींनी देशाला अनेक स्वप्ने दाखवली. त्यांनी लोकांना सबसिडी सोडा असे आवाहन करावे आणि हजारो लोकांनी गॅस सबसिडीवर पाणी सोडावे असे असंख्य प्रयोग यादरम्यान झाले. जनतेशी असलेली नाळ तुटू न देण्यासाठी ‘मन की बात’ सारखा प्रयोग त्यांनी केला. नोटबंदीसारखा धाडसी निर्णय घेणारे मोरारजी देसाईंच्या नंतर ते दुसरे पंतप्रधान ठरले. जीएसटीला प्रारंभी त्यांचा विरोध होता मात्र त्याच्या अंमलबजावणीची ऐतिहासिक कामगिरी त्यांच्याच काळात झाली. स्वच्छ भारत, देशभर वीजजोडणी, सर्वांना पिण्यायोग्य पाणी, सर्वांना घर, गरिबांना मोफत आरोग्यसेवा, जनधन बँक खाती, मेक इन इंडिया असे जगाने नावाजावेत असे प्रयोग मोदींनी सुरू केले. नोटबंदीवर कठोर टीका झाली तरीही यातून आपण देशातील काळा पैसा बाहेर काढला या मतावर ते तेव्हाही आणि आजही ठाम आहेत. जगभर भारताचे संबंध सुधारण्यासाठी त्यांनी काढलेल्या परदेश वाऱया कधी कौतुकाच्या तर बऱयाचदा टीकेच्या धनी झाल्या. मोदींच्या पहिल्या पंचवार्षिक काळात बँकिंग, न्यायसंस्थेपासून अनेक यंत्रणांचे खच्चीकरण झाले असा आरोप झाला. निवडणुकीच्या आधी झालेला पुलवामा हल्ला, राफेल खरेदी प्रकरण आणि देशात असलेली मंदीसदृश स्थिती त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाला घरघर लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली. मोदींच्या आक्रमक राजकारणाला विरोध करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष एकत्र येतील असेही वातावरण झाले. मात्र ती बडी आघाडी काही घडली नाही. सर्जिकल स्ट्राइक करून मोदींनी देशात पुन्हा वातावरण निर्माण केले आणि चौकीदार इमानदार आहे अशा वातावरणात 2019 ची निवडणूकसुद्धा खिशात टाकली. दुसऱयांदा सत्तेवर येताच इतक्मया गतीने कारभार सुरू झाला की रा. स्व. संघाचे स्वप्नच प्रत्यक्षात उतरले. मुस्लिमांच्या तिहेरी तलाकला कायद्याने बंदी, राम मंदिराच्या बाजूने निकाल, काश्मीरचे वेगळेपण आणि 370 कलम रद्द करून दाखवले, नागरिकता कायद्यात बदल हे सगळे इतक्मया गतीने झाले की नेमका कशाला विरोध करायचा हेही विरोधी पक्षाला ठरवणे मुश्कील झाले. मोदी आता 71 वर्षांचे झाले आहेत. जगातील त्यांच्या इतक्मयाच प्रभावी इतर नेत्यांनी कायदे बदलून आपले राष्ट्रप्रमुखपद बळकट केले आहे. पंच्याहत्तरीतल्या सर्व नेत्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवणारे मोदी काय करतात याकडे जगाचे लक्ष आहे. चीनबाबतीत त्यांचे धोरण फसले आहे. शेतकरी कायद्यांबाबत ते लोकांनाच नव्हे तर संघाच्या संघटनांना देखील समजावू शकलेले नाहीत. सरकारी कंपन्यांची विक्री, ठरावीक उद्योगपतींचे वर्चस्व, त्यांची कर्जमाफी, कोरोनाच्या संकटाचा अंदाज न येणे, घाईघाईत केलेला लॉकडाऊन, मजुरांचे झालेले हाल, बंद पडत असणारे उद्योग, घटणाऱया नोकऱया आणि बहुतांश मंत्र्यांची निष्क्रीयता यामुळे मोदींच्या लोकप्रियतेला झळ बसली आहे. विरोधकांशी टोकाची राजकीय खेळी करणारे मोदी जनतेप्रती मात्र सदैव नम्रताभाव राखूनच बोलतात. सातत्याने कशाचे ना कशाचे उद्घाटन, नव्या योजनांचे अशक्मयप्राय टार्गेट हा मोदींचा आवडता छंद आहे. यश अपयशाचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. विरोधकांना हैराण आणि लोकांना आश्चर्यचकित करणारी भूमिका हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. त्यामुळेच सध्या देशाचा कठीण काळ सुरू असताना मोदींच्या प्रयत्नांना यश यावे, अशी प्रार्थना तर त्यांचे विरोधकही करतील.
Previous Articleसांझ ढले…
Next Article पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1,20,860 वर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









