ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11.30 वाजता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत फोनवर संवाद साधला. या दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील सद्यस्थितीवर जवळपास 35 मिनिटे चर्चा केली. भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना मायदेशात परतण्यासाठी युक्रेनकडून केलं जात असलेल्या सहकार्याबाबत मोदींनी झेलेन्स्की यांचे आभार मानले. तसेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या थेट संवादाचेही त्यांनी कौतुक केले. भारत सरकारच्या सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने यासंदर्भात माहिती दिली आहे.
या संभाषणादरम्यान मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारने केलेल्या मदतीबद्दल झेलेन्स्की यांचे आभार मानले. तसेच सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेच्या प्रयत्नात युक्रेन सरकार मदत करत राहील, अशी आशा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. मोदींनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील सततच्या संवादासाठी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले.









