भाजप क्रमांक 1 : नितीश कुमार यांचा संजद तिसऱया स्थानी
चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात मोर्चा उघडून निकालांना अप्रत्यक्षपणे प्रभावित केले आहे. चिराग यांच्या भूमिकेमुळे नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दलाला भाजप तसेच राजदनंतर तिसऱया क्रमांकाच्या जागा जिंकता आल्या आहेत. या नव्या चित्रामुळे नितीश यांच्यासमोर नैतिकतेची मोठी समस्या उभी ठाकली आहे. परंतु भाजपने निवडणुकीदरम्यान अनेकदा जाहीरपणे निकाल काहीही लागला तरीही रालोआचे नेते नितीश कुमार हेच असतील असे स्पष्ट केले आहे. पण, भाजपच्या तुलनेत खूपच कमी जागांवर संजदला यश मिळाल्याने उहापोहाची स्थिती निर्माण झाली आहे.
रालोआतून बाहेर पडत स्वतंत्रपणे निवडणूक लढविणाऱया लोकजनशक्ती पक्षाला केवळ एका मतदारसंघात यश मिळाले असले तरीही त्याच्या वाटय़ाला 5.8 टक्के मते आली आहेत. तर भाजपला 19.8 टक्के, तर संजदला 15.4 टक्के मते प्राप्त झाली आहेत. राष्ट्रीय जनता दलाला 22.9 टक्के मते संपादित करता आली आहेत. लोजपने संजदच्या विरोधात उमेदवार उभे केले नसते तर नितीश कुमार यांचा पक्ष बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा ठरला असता, हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
संजदच्या जागा कमी करण्यात भाजपचीच मोठी भूमिका असल्याचा दावा राजकीय जाणकार आहेत. भाजप भले संजदच्या नेतृत्वात 2005 पासून सरकार स्थापन करत आला असला तरीही नितीश यांचा प्रभाव कमी करण्याची त्याची इच्छा सातत्याने वाढत राहिली आहे. भाजपने स्वतःच्या या इच्छापूर्तीसाठीच चिराग पासवान यांना मागील दाराने पुढे केल्याचाही दावा होतो. चिराग यांच्या लोजपने संजदच्या वाटय़ाला येणाऱया मतांमध्ये फूट पाडल्याचे चित्र आहे.









