प्रतिनिधी /बेळगाव
पशुसंगोपन खात्यामार्फत सोमवारी मोदगा येथे पाळीव जनावरांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात 300 हून अधिक जनावरांची तपासणी करून पशुपालकांना मोफत जंत प्रतिबंधक औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी गाय, म्हैस, घोडा, कुत्रे व मांजर व अन्य पाळीव जनावरांची तपासणी करण्यात आली. पावसाळय़ात जनावरांना वेगवेगळे आजार उद्भवत असतात. या पार्श्वभूमीवर खात्यामार्फत पाळीव जनावरांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत.
जंतांची समस्या प्रामुख्याने जनावरांमध्ये आढळून येते. यामुळे जनावरांचे आरोग्य निस्तेज व कमजोर होते. पावसाळय़ात जनावरांच्या पोटात जंत आणि कृमींची मोठय़ा प्रमाणात वाढ होऊन खाल्लेल्या अन्नातील पोषक तत्वांचे पोषण जंतांकडून होते. त्यामुळे जनावरांना आरोग्याच्या समस्या उद्भवतात. याकरिता पशुपालकांना जंतनाशक औषधांचे वितरण करण्यात आले. शिवाय पशुवैद्यकीय अधिकाऱयांकडून जनावरांच्या आरोग्याविषयी काळजी घेण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
याप्रसंगी तालुका साहाय्यक निर्देशक डॉ. श्रीकांत गांवी, गुरलिंग पट्टण, शशिधर कलकेरी, डॉ. प्रताप हन्नुरकर यासह इतर पशुवैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.









