प्रतिनिधी/ मडगाव
मडगावच्या मोती डोंगरावर देखील कोरोनाने शिरकाव केला असून शनिवारी एकटा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. काल त्यात आणखीन चार जणांची भर पडली. हे सर्वजण एकाच कुटूंबातील आहेत. कोरोनाचे रूग्ण सापडल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. काल या ठिकाणी अनेकांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या.
मोती डोंगरावरील एक वयस्क व्यक्ती शनिवारी पॉझिटिव्ह आढळून आली होती. ही व्यक्ती सिम्प्टोमेटिक असल्याने तिला कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर काल रविवारी चार जण पॉझिटिव्ह आढळून आले, ते एसिम्प्टोमेटिक असल्याने त्यांना शिरोडा येथील कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील लोकांनी इतरत्र जाऊ नये असा निर्णय घेतला असून स्वताहून लॉकडाऊन पुकारण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोती डोंगरावरील अनेक जण मडगाव शहरात नोकरी व्यवसाय करीत असून त्याची धास्ती शहरातील लोकांनी घेतली आहे.
आत्ता जे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे, त्यांचे लिंक हे मांगोरहिल वास्को असल्याचे सांगितले जात आहे. या पूर्वी सुद्धा काही जण मांगोरहिल भागात केल्याने, येथील नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती व त्यात ते निगेटिव्ह आढळून आले होते.









