प्रतिनिधी/ मडगाव
कोरानाच्या पार्श्वभूमीवर मोतीडोंगर -मडगाव हा परिसर सध्या अत्यंत संवेदनशील असा भाग बनलेला असून या परिसरातील एक व्यक्ती कोणत्याही कारणाविना आके -मडगाव भागात फिरत असताना मडगाव पोलिसांनी त्याला सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला अटक केली.
अब्दुल गफार कंत्राटी (37) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गस्तीवर असलेल्या मडगाव पोलिसांना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला वरील व्यक्ती आके परिसरात कोणत्याही कारणाविना फिरत असल्याचे आढळून आले आणि त्यानंतर त्याला मडगाव पोलीस स्थानकात नेऊन चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली.
दंडाधिकाऱयांनी जारी केलेल्या आदेशाचा भंग केल्याच्या आरोपावरुन भारतीय दं संहितेच्या 188 व 268 कलमाखाली त्याला अटक करुन नंतर जामिनावर सोडल्याचे पोलिसांनी सागितले.
मडगाव पोलिसांचे आवाहन
दरम्यान, मडगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांनी मडगावकरांना आवाहन केले आहे. कोणीही गरजेशिवाय घराबाहेर येऊ नये. अत्यंत आवश्यकता भासली तेव्हाच घराबाहेर येऊन काम झाल्यानंतर लगेच घरी परतावे असे श्री. नार्वेकर यांनी आवाहन केले आहे.









