बसथांब्यांची दुरवस्था, खुर्च्यांची मोडतोड : प्रवाशांना थांबावे लागते उन्हातच : बसथांब्यांच्या देखभालीकडे मनपा प्रशासन-स्मार्ट सिटीचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
जुना धारवाड रोड येथील जिजामाता चौकातील बसथांब्यातील आसनाची दुरवस्था झाली आहे. दगडांचा टेकू देऊन ठेवण्यात आलेल्या आसनावर प्रवाशांना बसावे लागत आहे. काही खुर्च्यांची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच राणी चन्नम्मा चौकातील काही बसथांब्यांची दुरवस्था झाली असल्याने स्मार्ट शहरात अशा प्रकारचेही बसथांबे असल्याचे पाहून सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
एकीकडे शहरातील बसथांब्यांचा विकास करून स्मार्ट बसथांबे निर्माण करण्यात येत आहेत. पण बसथांबे पूर्णपणे नेस्तनाबूत होत असताना देखील याकडे कानाडोळा केला आहे. शहरात बसथांबे उभारण्यासाठी महापालिका आणि स्मार्टसिटी कंपनीकडून ठिकठिकाणी स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले आहेत. मात्र सुशोभिकरण करण्यात आलेल्या बसथांब्यांच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळेच शहरातील बसथांबे कुचकामी बनू पहात आहेत. काही बसथांब्यांवर जनावरांनी अतिक्रमण केले आहे. काही ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले बसथांबे प्रवाशांसाठी गैरसोयीचे बनले आहेत.
बसथांबा की निर्वासितांचे आश्रयस्थान?
धर्मवीर संभाजी चौकातील बसथांब्यावर कुत्री व भटक्मया जनावरांनी ठाण मांडले असल्याने स्मार्ट बसथांबा जनावरांसाठी कि प्रवाशांसाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राणी चन्नम्मा चौकात व काही ठिकाणी मोडके बसथांबे आहेत. अशा ठिकाणी ना आसन व्यवस्था ना स्वच्छता अशी स्थिती असल्याने बसथांबा की निर्वासितांचे आश्रयस्थान? अशी विचारणा होते. राणी चन्नम्मा चौकातील बसथांबा पूर्णतः मोडकळीस आला आहे. बसथांब्याच्या दुरूस्तीकडे मनपा प्रशासन आणि स्मार्टसिटीने देखील कानाडोळा केला आहे. कित्येक महिन्यांपासून मोडकळीस आलेल्या स्थितीत हा बसथांबा उभा आहे. दुरूस्तीसाठी अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. पण याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी प्रवाशांना ऊन पावसात थांबावे लागते.
महापालिकेच्या निधीमधून जिजामाता चौकात स्मार्ट बसथांबा उभारण्यात आला. पण काही महिन्यातच आसन व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. याठिकाणी ठेवण्यात आलेल्या खुर्च्या मोडकळीस आल्या असून, दगडांवर खुर्च्या ठेवून त्यावर प्रवासी बसत आहेत. बसथांबे उभारण्याचे कंत्राट दिल्यानंतर ठरावीक अवधीसाठी त्याची देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. पण कंत्राटदारांनी देखभालीची जबाबदारी झिडकारली आहे. देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असल्याचे सांगून मनपाच्या अधिकऱयांनी देखील दुर्लक्ष केले आहे. यामुळे मोडकळीस आलेल्या बसथांब्यांना कोणी वाली नाही का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.









