नवी दिल्ली
फलंदाज योगा व खडतर सरावावर भर देत स्वतःला पूर्ण तंदुरुस्त राखू शकतात. पण, तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी धावणे बंद असेल तर अशा मोठय़ा ब्रेकमधून पुन्हा तंदुरुस्तीचा प्रवास विशेषतः जलद गोलंदाजांकरिता खूप कठीण असतो. एका अर्थाने असे मोठे ब्रेक जलद-मध्यमगती गोलंदाजांसाठी घातकच असतात, असे प्रतिपादन भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराने केले. सध्या कोव्हिड-19 मुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट जवळपास ठप्पच असले तरी जलद गोलंदाजांना आता किंवा लवकरच धावण्याचा सराव घेण्यास सुरुवात करावीच लागेल, असा दावा त्याने केला आहे.
भारतात सध्या तीन आठवडय़ांचा लॉकडाऊन सुरु असून यादरम्यान जवळपास अवघे क्रीडा विश्व ठप्प झाले आहे. यादरम्यान, तंदुरुस्त राहणे कोणत्याही खेळाडूसाठी महत्त्वाचे असेल. त्या पार्श्वभूमीवर नेहरा बोलत होता. ‘ब्रेक का मतलब ये नही की बिर्याणी खानी चाहिए’, असेही त्याने सांगितले.
नेहरा सध्या आयपीएल प्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी कार्यरत आहे. भारतातर्फे त्याने एकूण 164 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात 17 कसोटी, 120 वनडे व 27 टी-20 सामन्यांचा समावेश आहे.









