ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या दरात राज्य सरकारने पुन्हा एकदा बदल केले आहेत. सरकारने जारी केलेल्या सुधारित दराप्रमाणे आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी (RTPCR Test) 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले आहेत. अँटीजेन टेस्टसाठी 150 रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर नियंत्रित केले आहेत. आतापर्यंत किमान 5 ते 6 वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करण्यात आली. त्यामुळे हे दर 4500 रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार 500 रुपयांपर्यंत खाली आलेत. आता खासगी प्रयोगशाळांना 500 रुपयात ही चाचणी करणं बंधनकारक असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले.

- कोरोना चाचणीच्या दरांमधील टप्पेनिहाय कपात
यापूर्वी राज्य शासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये सातत्याने कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा केली. त्यानुसार अनुक्रमे 1200, 980 आणि 700 रुपये असे दर करण्यात आले होते. नव्या निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी 500, 600 आणि 800 असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून 500 रुपये आकारले जातील.








