अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार, 25 ऑक्टोबर 2021, स. 11.15
● नीचांकी बाधित वाढीची नोंद
● बाधित वाढ 50 च्या खाली
● पॉझिटिव्हिटी दर दोन टक्केच्या खाली
● रविवारी रात्री अहवालात 34 बाधित
● 2 हजार 429 जणांची तपासणी
● पॉझिटिव्हिटी दर 1.4 टक्के
● एकूण सक्रीय रुग्ण 714
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात सलग पंधराव्या दिवशीही बाधित वाढीचा आलेख शंभरच्या खाली राहिला. तर रविवारी रात्रीच्या अहवालाने जिल्ह्याला मोठा दिलासा दिला असून तब्बल नऊ ते दहा महिन्यानंतर फक्त 34 बाधित एवढी नीचांकी वाढ समोर आली आहे. पॉझिटिव्हिटी दराचा आलेखही दिलासादायक खाली घसरलेला आहे. गेले काही दिवस दोन टक्केवर स्थिर असलेला पॉझिटिव्हिटी दर रविवारी रात्री अहवालात 1.4 टक्के एवढा राहिला आहे. या दिलासादायक वातावरणातच दीपावलीची तयारी सुरू झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस या स्थितीमुळे लवकरच जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.
रविवारी रात्री अहवालात 34 बाधित
प्रशासनाकडून सोमवारी सकाळी देण्यात आलेल्या रविवारी रात्रीच्या अहवालातील माहितीनुसार 34 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. एकूण 2 हजार 429 जणांची तपासणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे. गत नऊ ते दहा महिन्यातील ही नीचांकी वाढ असून पॉझिटिव्हिटी दराचा आलेख 1.20 टक्के एवढा ही खाली घसरला असून तपासण्यांचा वेगही जिल्ह्यात कमी झाला आहे. सक्रिय रूग्ण संख्येचा आलेख देखील खाली बसला आहे.
जिल्ह्यात कोरोना स्थिती आटोक्यात
ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर जिल्हय़ातील कोरोना संसर्गाचा आलेख मोठय़ा प्रमाणावर खाली घसरला आहे. एकीकडे वेगाने सुरु असलेले लसीकरण व दुसरीकडे मंदावत असलेली बाधित वाढ या स्थितीत रविवारी रात्रीच्या अहवालाने मोठा दिलासा दिला आहे. या अहवालातील नोंदीनुसार खंडाळा, कोरेगाव, महाबळेश्वर, पाटण व वाई तालुक्यात एकही नवीन रुग्ण समोर आला नाही. तर सहा तालुक्यात देखील अल्प वाढ आहे. गत आठ महिन्यात पहिल्यांदाच पाच तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळून आला नसल्याने जिल्हय़ाची वाटचाल कोरोनामुक्ती होण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.
पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या साडे 19 लाखांवर
जिल्हय़ात लस घेणाऱ्या नागरिकांची एकूण संख्या 27 लाख 81 हजार 169 एवढी दिलासादायक झालेली असून यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 46 हजार 947 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 8 लाख 34 हजार 222 एवढी झालेली आहे.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 22,08,196
एकूण बाधित 2,50,876
कोरोनामुक्त 2,42,981
एकूण मृत्यू 6,412
सक्रीय रुग्ण 714
रविवारी जिल्हय़ात
बाधित 56
कोरोनामुक्त 13
मृत्यू 01









