तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आठवडाभरात शहरातील मोठय़ा शाळा-कॉलेजच्या इमारती, मोठी वसतिगृहे रुग्णसेवेसाठी ताब्यात घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी आज दिली.
शहरात सध्या 25 फ्ल्यू क्लिनिक आहेत. एक मोबाईल क्लिनिकही आहे. मात्र, रुग्णसंख्या ध्यानात घेता आठवडाभरात मोठय़ा इमारती ताब्यात घेऊन तिथेही रुग्णांवर उपचाराची सुविधा सुरू केली जाईल. मात्र कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
संसाधनांची मर्यादा ध्यानात घ्यावी
सोलापुरात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाय योजना अंमलात आणणे गरजेचे आहे. शहरातील फ्ल्यू क्लिनिकची संख्या किमान 40 वर नेली पाहिजे, शिवाय क्लिनिकचे विकेंद्रीकरण करून शहराच्या सर्वभागात डॉक्टर, नर्स आणि फार्मासिस्टसह ते उपलब्ध केले पाहिजे, असे मत राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना त्यांचे घर मोठे असल्यास घरीच विलगीकरण करून ठेवले पाहिजे. कारण त्याला रुग्णालयात दाखल केल्याने मानसिक भीती निर्माण झालेली असते. आपल्या संसाधनांची मर्यादा लक्षात घेऊन असे निर्णय स्थानिक पातळीवर घ्यायला हवेत. प्रत्यक्ष काम करणाऱया ‘फिल्ड टिम’ कार्यक्षम असणे गरजेचे आहे. सोलापूरात कोविडमुळे मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या जास्त आहे. त्याची कारणे शोधून ती संख्या घटवण्याचे प्रयत्न करायला हवेत. प्लाझ्मा थेरपीचा उपयोग चांगला होतो, मात्र ती प्रक्रिया गुंतागुंतीची आहे.
सांडपाण्यातून कोविडची लागण नाही : आवटे
सांडपाण्यामधून कोरोनाची लागण होत नाही, असा स्पष्ट निर्वाळा डॉ. प्रदीप आवटे यांनी दिला. गांधीनगर आयआयटीने सांडपाण्यातून कोरोना पसरत असल्याचे सांगितले होते, त्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेच्या मलवाहिन्या, कारखान्यांचे सांडपाणी यातून कोरोना पसरण्याची कोणतीही शक्यता नाही.
‘आयसीएमआर’कडून तपशील घेतो
सांडपाण्यातून कोरोना होत असल्याची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही. मात्र याविषयी ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ किंवा ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) संबंधित प्रतिनिधींशी बोलून तपशील घेत आहे, असे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले









