मयताच्या वारसांना दोन महिन्यात रक्कम देण्याचे लोकन्यायालयाचे आदेश
प्रतिनिधी / ओरोस:
न्यायालयाकडील प्रलंबित खटल्यांपैकी लक्ष्मीकांत नाईक विरुद्ध न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्यातील मोटार अपघात प्रकरणाच्या विमा रक्कम दाव्यात तब्बल 60 लाखांची तडजोड झाली आहे. शनिवारी झालेल्या लोक अदालतीत हा खटला तडजोडीने मिटविण्यात आला. एवढय़ा मोठय़ा रकमेची लोक अदालतीत सुटलेली ही पहिलीच घटना असल्याची माहिती इन्शुरन्स कंपनीचे वकील अजित भणगे यांनी दिली.
कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनिअर पदावर कार्यरत असलेले कोलगाव-सावंतवाडी येथील लक्ष्मीकांत नाईक (51) हे 15 जानेवारी 2019 रोजी आपल्या मोपेड (एमएच 07-झेड-1017) ने कुडाळ येथून कोलगावकडे आपल्या घरी जात होते. यावेळी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी येथील हॉटेल कारगीलसमोर सावंतवाडीकडून कुडाळकडे जाणारा टाटा ट्रकची (एमएच 09-एल-4946) त्यांच्या मोपेडला धडक बसली होती. या धडकेमुळे झालेल्या अपघातात लक्ष्मीकांत नाईक यांचा जागीच मृत्यू झाला होता.
कुडाळ पोलिसांच्या तपासात ट्रक चालक शिवाजी नागप्पा लोहार (26, रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर, कोल्हापूर) हा बेदरकारपणे ट्रक चालवत असल्याची बाब समोर आली होती. या प्रकरणी दोषारोप ठेवण्यात आला होता. मागील अडीच वर्ष हा खटला सुरू होता.
दरम्यान, हा खटला 25 रोजीच्या लोकअदालतीत तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात आला होता. जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस. व्ही. हांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश दीपक म्हालटकर, इन्शुरन्स कंपनीच्या रिजनल मॅनेजर सुजाता मालुसरे, कंपनीचे अधिकारी घुगे यांच्या प्रयत्नातून न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्या पॅनेलसमोर हा खटला तडजोडीने मिटविण्यात आला.
मयताची पत्नी अर्जदार मनिषा नाईक यांना तडजोडीपोटी 60 लाख रुपये दोन महिन्यात देण्याचे आदेश यावेळी इन्शुरन्स कंपनीला देण्यात आले. या प्रकरणी अर्जदारांच्या बाजूने ऍड. निखिल गावडे, तर इन्शुरन्स कंपनीच्या बाजूने ऍड. अजित भणगे, ऍड. मिहीर भणगे यांनी काम पाहिले.









