वार्ताहर / माशेल
प्रियोळ भाजपा मंडळातर्फे माशेल बसस्थानकावर थांबणाऱया मोटारसायकल पायलटांना कडधान्य वितरीत करण्यात आले. भाजपाच्या चाळीसाव्या स्थापनादिनाचे औचित्य साधून एकूण चाळीस पायलटांना हे कडधान्य मोफत पुरविण्यात आले. यावेळी भाजपाचे प्रताप वळवईकर, विनय गांवकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून मोटारसायकल पायलटांना ही मदत केल्याची माहिती विनय गावकर यांनी दिली. प्रियोळ भाजपा मंडळाचे अध्यक्ष तथा माजी सभापती ऍड. विश्वास सतरकर तसेच प्रताप वळवईकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रताप वळवईकर म्हणाले, मोटारसायकल पायलट हे उदरनिर्वाहासाठी हा व्यावसाय करीत असले तरी ती एक महत्त्वाची सेवा आहे. कोरोना महामारीच्या संक्रमणामुळे पायलटांचा व्यवसाय ठप्प झाला असून त्यांच्या कुटुंबाला मदत व्हावी या हेतुने भाजपा मंडळातर्फे त्यांना या धान्याचे वाटप केले आहे. सोशियल डिस्टसिंग सांभाळून हे वाटप करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.