संकेश्वर येथील पर्वतराव पेट्रोलपंपनजीक दुर्घटना : मृतांमध्ये संकेश्वरमधील तिघे तर एक जण बेळगाव खंजर गल्लीचा

प्रतिनिधी /संकेश्वर
भरधाव मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने सेवा रस्त्याच्या बाजूला असणाऱया कठडय़ाला मोटारसायकलची धडक बसून भीषण अपघात झाला. यात तिघे युवक जागीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात गुरुवार दि. 24 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास संकेश्वर येथील पर्वतराव पेट्रोलपंपनजीक राष्ट्रीय महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर घडला. मृत चौघांपैकी तिघे संकेश्वर येथील अनंत विद्यानगरमधील तर एक जण बेळगाव खंजर गल्लीतील रहिवासी आहे. बसू अर्जून माळी (वय 26), मेहबूब उर्फ बबलू सय्यद शेगडी (वय 21), प्रवीण कल्लाप्पा सनदी (वय 29) हे सर्व (रा. अनंत विद्यानगर, संकेश्वर) व फरहान समीर जमादार (वय 21 रा. खंजर गल्ली, बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत.
प्रवीण सनदी याला मोटारसायकलवरून घरी सोडण्यासाठी बसू माळी जात होता. यावेळी मोटारसायकलवर मेहबूब शेगडी व फरहान जमादारही होते. बसू माळी हा मोटारसायकल चालवत होता. चौघेजण एकाच मोटारसायकलवरून भरधाव निघाले होते. दरम्यान मोटारसायकलला हेडलाईट व ब्रेक नसल्याने येथील पर्वतराव पेट्रोलपंपनजीकच्या सेवा रस्त्यावर आल्यावर संरक्षक कठडा दिसला नाही.
यामुळे भरधाव मोटारसायकलीची कठडय़ाला जोराची धडक बसली. यात मोटारसायकलीसह चौघेही नजीकच्या खड्डय़ात कोसळले. या भीषण अपघातात बसू, मेहबूब आणि प्रविण हे तिघेही जागीच ठार झाले.
फरहान हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी संकेश्वर येथील समुदाय आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यानंतर प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी त्याला बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच शुक्रवारी पहाटे 5 च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती संकेश्वर पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करुन मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून दिले.
रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास आमची मुले मेहबूब उर्फ बबलू शेगडी व फरहान जमादार हे दोघे जेवण करुन बसले होते. याचवेळी बसू तेथे आला व त्याने मेहबूब व फरहान याला बोलावून नेले. नजीकच कोठेतरी फिरण्यास नेहमीप्रमाणे जात असणार या विचाराने आम्ही आमच्या कामात लागलो होतो, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान काहीवेळाने अपघाताचे वृत्त समजताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तर अनंत विद्यानगरात स्मशान शांतता पसरली.
फरहान हा नेहमी संकेश्वरला येत असे
फरहान याचे वडील मानसिकदृष्टय़ा कमकुवत होते. तर आई बेळगाव येथेच नातेवाईकांसोबत दुसऱया ठिकाणी रहात होती. तर फरहान हा नेहमी आपल्या संकेश्वर येथील मावशीकडे येऊन रहात होता. गत 15 दिवसांपूर्वी तो संकेश्वर येथे अनंत विद्यानगरात आला होता. याठिकाणी तो नेहमी आपला मावस भाऊ मेहबूबसोबत असे. यात दोघांचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. फरहान याच्या पश्चात आई-वडिल व भाऊ असा परिवार आहे.
मेहबूब उर्फ बबलू याच्या पश्चात आई व विवाहित बहीण असा परिवार आहे. तर मृत बसू माळी हा येथील बसस्थानकानजीक फुलांच्या दुकानात काम करीत होता. त्याच्या आई-वडीलांचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. त्याच्या पश्चात आई, वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. तर मृत प्रविण सनदी हा बसूचा जीवलग मित्र होता. प्रविण याचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला असून त्याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुली असा परिवार आहे.
घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात
बसू माळी याच्या मृतदेहावर अंकले येथे अंत्यविधी करण्यात आला. मेहबूब उर्फ बबलू याच्यावर संकेश्वर येथील मुस्लीम स्मशानभूमीत दफनविधी झाला. प्रविण सनदी याच्यावर संकेश्वर येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर फरहान याच्यावर बेळगाव येथे स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आले. या घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे. दरम्यान अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महालिंग नंदगावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पुढील तपास करण्याची सूचना अधिकाऱयांना दिली आहे.









