पाच तास विहिरीत अडकून
प्रतिनिधी / म्हापसा
देव तारी त्याला कोण मारी? असे म्हटले जाते. या म्हणीचा प्रत्यय जुने गोवे पोलिस स्थानकाच्या पोलीस शिपायाला आज मिळाला. हमरस्त्यालगत असलेल्या सुमारे 30 फूट खोल विहिरीत दुचाकीवरून पडूनही पोलीस शिपाई स्वप्नील गांवस (29) हा जिवंत राहिला. अखेर पाच तासांनी म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी स्वप्नीलला सुखरुप बाहेर काढले. हमरस्त्याच्या बाजूला असलेली ही खोल विहीर त्वरित बुजवावी, अशी मागणी या भयानट नाटय़ानंतर येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.
जुने गोवे पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई स्वप्नील गांवस डय़ूटी संपवून पल्सर (जीए 04 डी 6931) या मोटरसायकलने जुने गोवेहून वझरी-पेडणे येथे पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यात जात असता कोलवाळ मुशीर आंबेडकर हायस्कूलजवळ पोचलयावर गाडीचा ताबा गेलयाने बाहेर गेला असता तो बाजूला झाडीत कोसळला. पल्सर गाडी झाडावर आडवी होऊन राहिली तर स्वप्नील रस्तयाच्या बाजूला असलेल्या 30 फूट खोल विहीरीत कोसळला. त्यांनी आरडाओरडा केला परंतु तिथे कुणीही नव्हते. अखेर डय़ूटीवरील आपली शिटी वाजवून आवाज देत राहिलयाने तेथून जाणाऱया वाटसरूंना गाडी झाडावर लटकत असल्याचे दिसले व बाजूला जाऊन विहिरीत पाहिले असता कोणीतरी पडल्याचे त्यांना आढळले. ही बातमी सकाळी पावणे नऊच्या सुमारास सर्वत्र वाऱयासारखी पसरल्यानंतर म्हापसा अग्निशामक दलास देण्यात आली. उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज शेटगावकर, सुरज कारापूरकर, गिरीश गांवस, नितीन चोडणकर या जवानांनी लाईफ जॅकेट, शिडीचा वापर करून स्वप्नील यांना सुखरुप बाहेर काढले. स्वप्नील किरकोळ जखमी झाला आहे. ट्रफीक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा गोसावी यांनी त्यांना मदत केली.









