स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची आर के नगर परिसरात कारवाई; सहा दुचाकी जप्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरातील सुभाष नगर येथे रेकॉर्डवरील मोटर सायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. विजय भगवान पवार (वय 27, रा. दत्त मंदिर शेजारी सुभाष नगर ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. सुभाषनगर चौक ते आर के नगर मार्गावर असणाऱ्या कुष्ठरोग इमारतीसमोर कारवाई करण्यात आली.त्याच्याकडून एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. चोरट्यास राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
रेकॉर्डवरील गुन्हेगार विजय हा आर के नगर परिसरात चोरीची दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने या परिसरात सापळा रचला. रेकॉर्डवरील गुन्हेगार विजय हा नंबर प्लेट नसलेली दुचाकी घेऊन या परिसरात आला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता ही दुचाकी चोरीची असल्याची बाब समोर आली.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता या दुचाकी व्यतिरिक्त अन्य पाच दुचाकी त्याने चोरी केल्याचे समोर आले. त्याच्या राहत्या घराजवळून पोलिसांनी एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या या दुचाकी जप्त केल्या. चोरटा विजय कडे मिळालेल्या मोटर सायकल बाबत राजारामपुरी जुना राजवाडा गडहिंग्लज भुदरगड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा तर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे नोंद आहेत.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, आसिफ कलायगार, सुरेश पाटील, विनोद कांबळे, संजय पडवळ, संतोष पाटील, अनिल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.