रेल्वेतून विदेशमंत्री जयशंकर यांचा प्रवास ः भारताच्या मदतीने बुजी ब्रिजची निर्मिती
वृत्तसंस्था/ मापुटो
भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर हे सध्या मोझाम्बिक या देशाच्या दौऱयावर आहेत. या दौऱयादरम्यान त्यांनी मेड इन इंडिया रेल्वेमधून प्रवास केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मोझाम्बिकचे वाहतूक मंत्री माटेउस मागला आणि रेल्वे इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसचे प्रमुख राहुल मित्तल उपस्थित होते. जयशंकर हे मोझाम्बिकचा दौरा करणारे भारताचे पहिले विदेशमंत्री ठरले आहेत.
जयशंकर यांनी याचबरोबर मोझाम्बिकमध्ये भारताकडून निर्मित बुजी ब्रिजचे व्हर्च्युअली उद्घाटन केले आहे. हा ब्रिज द्विपक्षीय एकजुटता आणि मैत्रीचे सर्वात मोठे उदाहरण असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. हा पूल 670 मीटर लांबीचा असून तो बुजी नदीवर निर्माण करण्यात आलेला आहे. 132 किलोमीटर लांबीच्या टिका-बुजी-नोवा-सोफाला रस्ते प्रकल्पाचा हा ब्रिज हिस्सा आहे. या प्रकल्पाला भारताकडूनच अर्थसहाय्य केले जात आहे.

विदेशमंत्री एस. जयशंकर हे 15 एप्रिलपर्यंत मोझाम्बिकच्या दौऱयावर असणार आहेत. जयशंकर यांनी द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी मोझाम्बिकच्या संसद अध्यक्षांची भेट घेतली आहे. यानंतर भारतीय राजदूतांकडून आयोजित स्वागत समारंभात भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींची जयशंकर यांनी भेट घेतली आहे. याचबरोबर विदेशमंत्र्यांनी मोझाम्बिकची राजधानी मापुटो येथल श्री विश्वंभर महादेव मंदिरात पूजा केली आहे.
मेड इन इंडिया रेल्वेतून मापुटो ते माचवापर्यंतचा प्रवास खरोखरच उत्तम होता. मोझाम्बिकचे परिवहन अन् दूरसंचारमंत्र्यांसोबत हरित वाहतुकीवर चर्चा केली आहे. रेल्वेजाळे, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि जलवाहतुकीच्या विस्ताराविषयी चर्चा झाली. भारत यासंबंधी एक विश्वसनीय भागीदार असल्याचे उद्गार जयशंकर यांनी एका पत्रकार परिषदेत काढले आहेत.









