चोरटय़ाने मंगळसूत्र लांबविले, खास पथकाकरवी तास सुरू
सावंतवाडी-माजगाव येथील घटना, चोरटा माहीतगारच कुंपणावरून उडी मारत केले पलायन
वार्ताहर / सावंतवाडी:
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेला सावंतवाडीनजीक माजगाव येथे अडवून, गळा आवळत अडीच तोळय़ाचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले. भरवस्तीत माजगाव दत्त मंदिरजवळ हा प्रकार घडला. चोरटय़ाने तोंडाला मास्क लावला होता. चोरटा माहीतगार असावा, असा पोलिसांना संशय आहे. सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱया महिलांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभडे यांनी या घटनेची दखल घेत चोरीच्या तपासासाठी तात्काळ ओरोस येथून अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिकारी तुषार पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथक सुनील धनावडे यांचे पथक पाठविले. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके आणि पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, सचिन शेळके यांनी घटनास्थळी भेट देत सावंतवाडी, माजगाव परिसरात नाकाबंदी केली.
शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे सावंतवाडी-सालईवाडा येथील सौ. कांचन अनिल शिरसाट (52) आणि त्यांची मुलगी प्राजक्ता सकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडल्या. सावंतवाडी-सालईवाडा ते माजगाव दत्तमंदिर असे सुमारे दीड ते दोन कि. मी. अंतर चालत त्या माजगाव दत्तमंदिर परिसरात आल्या. तेथे डॉ. निर्मला सावंत यांच्या निवासस्थानानजीक रस्त्यावर एक तरुण जॅकेट आणि तोंडाला मास्क लावून उभा होता. शिरसाट रस्त्याने चालत काही अंतरावर जाताच मागून येत त्या तरुणाने शिरसाट यांच्या गळय़ाला दोन्ही हाताने पकडले. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झटापटही झाली. त्या रस्त्यावर खाली पडताच चोरटय़ाने काही सेकंदातच त्यांच्या गळय़ातील मुहूर्तमणी असलेले अडीच तोळय़ाचे मंगळसूत्र लंपास केले. या रस्त्यालगतच्या हरसावंतवाडा भागातील पाणंदीतून त्याने पलायन केले.
पाणंदीतून पळ काढला
अज्ञात चोरटा माहीतगार असून त्याला या भागाची चांगली माहिती असावी. सदर महिला नेहमी याच वेळेत मॉर्निंग वॉकला जाते, याची माहिती घेत चोरटा सकाळी सहा वाजता या मार्गावर उभा होता. काही स्थानिकांनी त्याला पाहिले होते. महिला एकटी चालत येत असल्याचे पाहून चोरटय़ाने काही वेळातच तिचा गळा पाठीमागून पकडत मंगळसूत्र खेचून लंपास केले. त्यानंतर चारटय़ाने सावंत यांच्या घराच्या कुंपणाच्या भिंतीवरून उडी टाकत पाणंदीतून पळ काढला.
सचिन मोरजकर यांची धाव
घटनास्थळापासून काही अंतरावर दत्तमंदिर आहे. तेथे सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरजकर मित्रांसोबत उभे होते. त्यांना एका महिलेशी कुणीतरी झटापट करतोय असे दृश्य दिसले. महिलेची आरडाओरड ऐकताच मोरजकर यांनी तेथून धावत येऊन या महिलेला सावरले. चोरटा ज्या दिशेने गेला, त्या दिशेने मोरजकर यांनी पाठलाग केला. मात्र, तो सापडला नाही. स्थानिक पवन सावंत, सखाराम सावंत, हेमंत रेडकर, सावंत, एल. जी. परब, दत्तगुरू भोगणे, मळगाव माजी सरपंच गणेश पेडणेकर यांनी या महिलेला धीर देत तिच्या घरी सोडले.
मुलगी पुढे गेली अन्…
कांचन शिरसाट यांच्यासोबत त्यांच मुलगी प्राजक्ता होती. ती पुढे जात दत्त मंदिरात थांबली. ती पुणे येथे नोकरीला आहे. काही दिवसांपूर्वी ती गावी आली होती. महिला एकटीच असल्याचे संधी साधून चोरटय़ाने मंगळसूत्र लंपास केले.
मंगळसूत्राचा काही भाग मिळाला
चोरटय़ाने मंगळसूत्र लंपास करताना ते तुटले. त्याचा काही भाग रस्त्यावर पडला होता. तो सापडला आहे. चोरटय़ाने पलायन करताना तसेच कुंपणावरून उडी घेताना दुखापत झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
या घटनेनंतर पोलिसांनी माजगाव परिसरात नाकाबंदी केली. आहे. चोरटय़ाच्या पेहरावावरून तो परप्रांतीय असावा. येथे भाडय़ाने राहत असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी माजगाव भागात शोधमोहीम सुरू केली. भाडोत्रींची माहिती घेण्यात येत आहे. शिरोडा नाका येथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पण पुढे नाहीत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस तपास करीत आहेत. चोरटय़ाला जेरबंद करू, असा विश्वास डॉ. साळंके यांनी व्यक्त केला.









