आंतरधर्मीय युगुलांना खुलेआम मारहाण : कमजोर पोलीस यंत्रणेमुळे गावगुंडांचे फावले : परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व परिसरात सध्या मॉरल पोलिसिंगच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांमुळे सामाजिक वातावरण कलुषित होऊ लागले आहे. पोलीस दलासाठीही अशा घटना डोकेदुखीच्या ठरू लागल्या आहेत. पोलिसांनी वेळीच नैतिक पोलीसगिरीला आवर घातला नाही तर सामाजिक वातावरण आणखी गढूळ होण्याचा धोका आहे.
गेल्या पंधरवडय़ात शहर व उपनगरात नैतिक पोलीसगिरीच्या पाचहून अधिक घटना घडल्या आहेत. खासकरून आंतरधर्मीय प्रेमीयुगुलांना टार्गेट केले जात आहे. अशी प्रकरणे पोलीस स्थानकापर्यंत पोहोचल्यानंतर एफआयआर दाखल करण्याऐवजी समज देऊन सोडून देण्याच्या प्रकारामुळे नैतिक पोलिसांचे मनोबल वाढत चालले आहे. त्यामुळेच वारंवार अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ लागली आहे.
बुधवारी संयुक्त महाराष्ट्र चौक परिसरात फिरणाऱया आंतरधर्मीय महिला व युवकाला ताब्यात घेऊन खडेबाजार पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी कुटुंबीयांना बोलावून त्यांच्याकडे सोपविले. समाजस्वास्थ्याला धक्का पोहोचू नये म्हणून अशी प्रकरणे नाजूकपणे हाताळली जात आहेत. दि. 13 ऑक्टोबर रोजी दुपारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून हिंदू तरुण व मुस्लीम तरुणीला अमननगर परिसरात नेऊन रिक्षाचालकांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी माळमारुती पोलिसात एफआयआर दाखल झाला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या घटनेपूर्वी लोंढा परिसरातील आंतरधर्मीय परिचित तरुण-तरुणींना मध्यवर्ती बसस्थानकाजवळ गाठून मारहाण केल्याची घटना घडली होती.
दसऱया दिवशी चिकन दुकान बंद ठेवले नाही म्हणून यमनापूर येथील एका चिकन दुकानदाराला मारहाण करण्यात आली आहे. गेल्या पंधरवडय़ात घडलेल्या या घटना लक्षात घेता जातीय सलोख्याला सुरुंग लावण्यासाठी असे प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. स्वतः गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी बेळगाव येथील अशा घटनांची गांभीर्याने दखल घेतली आहे. मॉरल पोलिसांवर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी पोलीस दलाला दिली आहे.
28 सप्टेंबर रोजी खानापूर येथे झालेल्या अरबाज मुल्ला (वय 24) या तरुणाच्या खुनानंतर बेळगाव परिसरात अशा घटना वाढल्या आहेत. खासकरून मध्यवर्ती बसस्थानक किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी फिरणाऱया तरुण-तरुणींवर नजर ठेवून जर यामध्ये आंतरधर्मीय युगुल, मित्र-मैत्रिणी आढळल्यास त्यांना मारहाण करून धमकाविण्याचे प्रकार सुरू आहेत.
गृहखात्याने पोलीस दलाला कामाला लावण्याची गरज
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. मॉरल पोलिसिंग संबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे वातावरण अधिक गढूळ होत चालले आहे. स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांच्या दादागिरीमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणीही तक्रार दाखल केलेल्या नाहीत, असे सांगत पोलीस अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत. बेळगाव येथील सध्याची परिस्थिती लक्षात घेता जातीय गुंडगिरी थोपविण्यासाठी गृहखात्याने पोलीस दलाला कामाला लावण्याची गरज आहे.
सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात!
पोलीस अधिकाऱयांनी जर व्यवस्थितपणे आपली जबाबदारी पार पाडून गुन्हेगारी व गुन्हेगारांवर जरब बसविली तर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आटोक्मयात असते. सध्या बेळगाव येथील परिस्थिती पाहता पोलीस अधिकाऱयांना आपल्या जबाबदारीचा विसर पडल्याचे दिसून येते. बहुतेक अधिकारी फोन उचलत नाहीत. नागरिकांकडून येणाऱया तक्रारींची दखल घेतली जात नाही. काही पोलीस ठाणी तर रिअल इस्टेट एजंटांचे अड्डे बनले आहेत. पोलीस स्थानकाची भिंत बांधायची आहे, रंगरंगोटी करायची आहे, असे सांगत सर्वसामान्य नागरिकांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. मटका, जुगारी अड्डय़ावरील कारवाया थांबल्या आहेत. अधिकारी व अड्डेचालक यांच्यातील साटेलोटे वाढल्यामुळे उघडपणे गैरधंदे सुरू झाले आहेत. जेव्हा जेव्हा पोलीस दल वेगवेगळय़ा कारणांनी निष्क्रिय बनते, तेव्हा
मॉरल पोलिसिंगचे प्रकार वाढतात. पोलीस अधिकाऱयांकडून कामे होत नाहीत तेव्हा गावगुंडांचे फावते. सध्या बेळगावात अशीच परिस्थिती आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी वेळीच लक्ष घालून कामचुकार अधिकाऱयांना वठणीवर आणले नाही तर बेळगावकरांना याचे परिणाम भोगावे लागणार आहेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस अधिकाऱयांना आपण जनतेचे सेवक आहोत, याचे भान उरले नाही. पोलीस ठाण्याचे मालक होऊन अनेक अधिकारी गैरधंद्यात बुडाले आहेत. त्यामुळेच परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.









