युरोपीय महासंघाकडून 21 डिसेंबर रोजी निर्णय
अमेरिकन औषध कंपनी मॉडर्नाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नव्या डाटामध्ये त्याची लस अत्यंत सुरक्षित ठरविण्यात आली आहे. अमेरिकेकडून चालू आठवडय़ातच या लसीला आपत्कालीन वापराची मंजुरी मिळण्याची अपेक्षा बळावली आहे. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनकडून या लसीला शुक्रवारी मंजुरी दिली जाऊ शकते.
या मंजुरीनंतर सोमवारपर्यंत लाखो नागरिकांना आणखी एक लस मिळणार आहे. मागील आठवडय़ातच अमेरिकेत फायजर लसीला मंजुरी मिळाली असून त्याचे लसीकरणही सुरू झाले आहे. 30 हजार लोकांवरील परीक्षणानंतर मॉडर्नाच्या लसीची प्रभावोत्पादकता 94.1 टक्के दिसून आली होती. लस घेतल्यावर संबंधितांना ताप, डोकेदुखी आणि थकवा यासारख्या तक्रारी जाणवल्या होत्या, परंतु या अत्यंत धोकादायक नाहीत.
युरोपीय महासंघाची बैठक
युरोपीय महासंघाच्या वैद्यकीय संस्थेने 27 देशांसाठी फायजर-बायोएनटेकच्या लसीला मंजुरी देण्यासाठी 21 डिसेंबर रोजी बैठक करणार असल्याचे जाहीर केले आहे. संस्थेने याप्रकरणी पूर्वीपासूनच निर्धारित 29 डिसेंबरची बैठक लवकरात लवकर घ्यावी, जेणेकरून लसीला मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करता येणार असल्याचे जर्मनीच्या आरोग्य मंत्र्याने म्हटले होते.









