वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेतील नागरिकांवर चाचणी करण्यात आलेली कोरोना विषाणूवरील पहिली लस प्रभावी ठरली आहे. मॉडर्ना या कंपनीने प्रारंभिक निष्कर्ष जाहीर केल्यावर कोरोनावरील लस लवकरच मिळणार असल्याची नवी आशा जगाला प्राप्त झाली आहे. या लसीची चाचणी मार्चमध्ये सुरू झाली होती. 8 जणांना या लसीचा डोस देण्यात आल्यावर त्यांच्या शरीरात अँटीबॉडी निर्माण झाल्या आहेत. या अँटीबॉडीजची प्रयोगशाळेत मानवी पेशींवर चाचणी करण्यात आली. या अँटीबॉडीज विषाणूला स्वतःचा क्लोन निर्माण करण्यापासून रोखत असल्याचे आढळून आले आहे.
कोरोनापासून मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये आढळून आलेल्या अँटीबॉडीइतकेच प्रमाण चाचणीवेळी शरीरात दिसून आले आहे. अमेरिकेच्या कंपनीनुसार लसीच्या दुसऱया टप्प्यातील चाचणीत 600 जणांवर परीक्षण केले जाईल. सर्वकाही सुरळीत राहिल्यास जुलैमध्ये हजारो सुदृढ लोकांवर या लसीची चाचणी होणार आहे. योजनेनुसार चालू वर्षाच्या अखेरीस किंवा 2021 च्या प्रारंभी जगाला कोरोनावरील लस मिळू शकते.
योग्य डोस समजणार
लसीच्या दुसऱया टप्प्यातील चाचणीला परवानगी मिळाली आहे. 250 एमसीजीच्या डोसच्या जागी 50 एमसीजीयुक्त डोसची चाचणी करू इच्छित असल्याचे मॉडर्नाने म्हटले आहे. दुसऱया टप्प्यात लसीची किमान मात्रा शोधली जाणार आहे. योग्य प्रमाणात लसीचा डोस तयार करण्यासाठी ही चाचणी होणार आहे.
अन्य चाचण्याही सुरूच
मॉर्डनासह अनेक कंपन्यांनी कोरोनावरील लस निर्मितीचे प्रयत्न चालविले आहेत. क्युअरवॅकने प्रीक्लीनिकलचे निष्कर्ष जगासमोर मांडले आहेत. या कंपनीच्या लसीच्या प्राण्यांवरील चाचणीचे निष्कर्ष उत्साह वाढविणारे आहेत. वेरिली या कंपनीचे अँटीबॉडी टेस्टिंगसंबंधी नवे क्लीनिकल संशोधन सुरू केले आहे.
लहान डोस ठरला प्रभावी
8 लोकांना अल्प, मध्यम आणि उच्च डोस देण्यात आले होते. प्राप्त झालेले निष्कर्ष अल्प आणि मध्यम डोसचे आहेत. या लसीचा एक साईड इफेक्ट दिसून आला आहे. एका रुग्णाच्या हातावर ज्या ठिकाणी लस देण्यात आली होती, तेथे लाल रंगाचा चट्टा दिसून आला.
मोठा डोस, शरीरात अधिक अँटीबॉडीज
8 पैकी 4 जणांना 100 एमसीजी आणि उर्वरितांना 25 एमसीजीचा डोस देण्यात आला होता. अधिक डोस मिळालेल्या लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज देखील अधिक प्रमाणात आढळून आल्या आहेत.









