सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी कॅन्टोन्मेंटकडे केला अर्ज
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डने शाळेचे मैदान 20 वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर दिले आहे. मात्र, यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना मैदान अपुरे पडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट आणि खासगी स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये झालेल्या कराराची माहिती देण्यात यावी, तसेच कराराची प्रत मिळावी, असे पत्र सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी कॅन्टोन्मेंट मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना दिले.
कॅन्टोन्मेंट कार्यालय आवारात उर्दू, मराठी व इंग्रजी माध्यम शाळा चालविण्यात येतात. कॅन्टोन्मेंट बोर्डकडून सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन पारितोषिके पटकाविली आहेत. मात्र, मैदानाच्या विकासाच्या नावाखाली शाळेचे निम्मे मैदान पुणे येथील खासगी स्पोर्ट्स अकॅडमीला 20 वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर दिले आहे. या मोबदल्यात खासगी अकॅडमीकडून कोणतेच भाडे आकारले नाही. कराराची माहिती देण्यास टाळाटाळ चालविली आहे. त्यामुळे सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी पत्र देऊन माहिती देण्याची विनंती केली.
तीन माध्यमांच्या शाळांमध्ये कॅन्टोन्मेंट परिसरातील बहुतांश विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गरीब आणि गरजू वर्गातील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी तसेच व्यायामासाठी मैदान उपलब्ध केले आहे. पण सदर मैदान खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर दिले असून, या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळण्यास मज्जाव केला जात आहे. त्यामुळे कोणत्या करारानुसार शाळेचे मैदान भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे, याची सविस्तर माहिती मिळावी, तसेच कराराची प्रत द्यावी, असे निवेदन तुपेकर यांनी कॅन्टोन्मेंट मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडे दिले. त्यामुळे कॅन्टोन्मेंट या कागदपत्रांची पूर्तता करणार का? याकडे लक्ष लागले आहे.









