प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या खुल्या जागा आणि मैदानांचा वापर विविध कार्यक्रम आणि उपक्रमांसाठी केला जातो. याकरिता महापालिकेकडून मैदानाचे भाडे आकारण्यात येते. सध्या व्यावसायिक कारणासाठी आणि सामाजिक उपक्रमासाठी आकारण्यात येणारे भाडे डोईजड बनले असून महापालिकेचे मैदान नकोरे बाबा! असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धा आयोजनास खीळ बसली आहे.
व्हॅक्सिन डेपो येथील मैदान, सुभाषचंद्र बोस मैदान (लेले ग्राऊंड), संभाजी उद्यान, शांती कॉलनी येथील मैदान, श्रीनगर येथील मैदान अशा मैदानांचा वापर विविध कार्यक्रमांकरिता केला जातो. सामाजिक उपक्रम, क्रीडास्पर्धा, धार्मिक कार्यक्रम आणि राजकीय कार्यक्रमासाठी मैदानांचा वापर सर्रास करण्यात येतो. याकरिता महापालिकेकडून अल्प भू-भाडे आकारण्यात येत होते. पण याचे भाडे दुप्पट करण्यात आल्याने क्रीडा स्पर्धा आयोजकांना व सामाजिक संस्थांना मैदानाच्या भाडय़ाचा आर्थिक भुर्दंड भरावा लागत आहे. यापूर्वी क्रीडा स्पर्धा व धार्मिक कार्यक्रमासाठी अडीच हजार रुपये प्रती दिवस भाडे घेण्यात येत होते. व्यावसायिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी प्रति दिन 5 हजार रुपये भाडे आकारण्यात येत होते. यासोबत स्वच्छता कर म्हणून 500 रुपये घेण्यात येत होते. पण महापालिकेने हे भाडे दुप्पट केले असून, विविध संघटनांना भाडे भरणे अशक्मय बनले आहे.
लेले ग्राऊंड, व्हॅक्सिन डेपो मैदान आणि संभाजी उद्यान अशा ठिकाणी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. विविध संघटना व क्रीडाप्रेमींच्यावतीने क्रीडा स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना प्राधान्य देण्यात येते. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना व्यासपीठ मिळते, हा उद्देश ठेवून या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. मात्र महापालिकेकडून क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी मैदानाचे भाडे प्रतिदिन 5 हजार रुपये आकारण्यात येत आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचे ठप्प झाले आहे. आयोजकांना हे भाडे डोईजड होत असल्याने क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. संभाजी उद्यानसारख्या ठिकाणी सामाजिक उपक्रम व पारायण सोहळे आयोजित करण्यात येतात. धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठीही 5 हजार रुपये प्रति दिन भाडे महापालिकेकडून आकारण्यात येत आहे. त्यामुळे इतकी भाडय़ाची रक्कम भरणे अशक्मय आहे. मैदानाचे भाडे कमी करण्यात यावे, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. पण याची दखल महापालिकेने घेतली नाही. क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी मैदानाची विचारणा होत आहे. पण मैदानाचे भाडे ऐकून आयोजक थक्क होत आहेत. त्यामुळे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी क्रीडापटूंना व्यासपीठ मिळणे मुश्कील बनले आहे. क्रीडा स्पर्धा आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी मैदानाचे भाडे कमी करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.









