मित्रांनो, जगात काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचे मोल कधी विसरता येत नाही. त्यापैकी एक म्हणजे ’मैत्री’. मैत्री हा अनमोल ठेवा आहे, म्हणून प्राचीन काळापासून अशा मैत्रीला नावाजले जाते. ज्याला खरा मित्र लाभला, तो खऱया अर्थाने धनवान असतो. नाहीतर कोटय़वधी रुपये आहेत पण मनीचे सुख-दुःख उघड करायला कोणीही मित्र नाही, तो राव असूनही रंकच आहे.
मैत्री कधी कुणाशी कशी होईल काही सांगता येत नाही. शाळेत गेल्यावर आपल्याला पहिल्यांदाच बाहेरच्या जगाशी ओळख होते. शालेय जीवनापासून सुरुवात होते ती सगळी नाती समजायला आणि नवीन नाती आत्मसात करायला. आपल्याला मैत्रीची ओळखही तिथेच होते. एकाच बाकावर बसून एकमेकांना मदत करत, खेळताना एकमेकांशी भांडत, रागवत आपण सुरुवात करतो ती मैत्रीला. त्या वयात एकमेकांचे स्वभाव ओळखणं आपल्या निरागस मनाला माहीत नसतं. त्यामुळे आपण सगळय़ांशी मैत्री करतो. पण जसजसं वय वाढत जाते आपणही समाजाच्या दृष्टीकोनातून विचार करायला लागतो. समोरच्या माणसाच्या स्वभावातील विविध कंगोरे जाणून घ्यायला लागतो. तिथेच ओळख होते. आपल्याला खऱया मैत्रीची तोपर्यंत शालेय जीवन मागे टाकून मनावर आपण सज्ञान झाल्याचं बिंबवीत कॉलेज जीवनात प्रवेश केलेला असतो. सगळय़ांशीच ओळख असली प्रत्येकाचे गट पडत जातात, मग तो कितीही जणांचा दोन, चार, सहा, दहा, पंधरा, बस्स…! ह्यांचं जग मग तेवढय़ापुरतंच मर्यादित होतं. आमचा दहा जणाचा ग्रूप आहे. आम्ही सगळे चांगले मित्र आहोत, सगळे एकमेकांना खूप समजावून घेतो, एकमेकांच्या मदतीला धावून जातो. मैत्री पूर्णपणे जगतो. त्यांच्यात इतरांना प्रवेश नसतो. प्रत्येकाचं असे असते. मैत्री ही निरपेक्ष असते. कुणावर जबरदस्ती करून आपली मैत्री त्याच्यावर थोपविता येत नाही, ती मनापासून उमलायला लागते. मैत्रीमध्ये एकमेकांबद्दल मनापासून काळजी असते, प्रेम वाटायला पाहिजे. ती भावना मनात रूजायला हवी तरच मैत्री चिरकाल टिकते. आपले नातेवाईक जन्मानेच आपल्याला मिळालेले असतात पण आपले मित्र मैत्रिणी तरी आपण निवडू शकतो, ही देवाची कृपाच महनायला हवी.
सगळय़ांची मैत्री आपल्याला चांगल्या मार्गाला नेईल असंही नाही, काहींशी मैत्री करून बरेच जण वाईट व्यसनाकडे, वाईट प्रवृत्तीकडे वळतात. अशी मैत्री आपल्याला आयुष्यातून उठवते, निरर्थक बनवते. बरेच जण मैत्री करताना एखाद्याला निरखून पारखून घेतात. एखादा विद्यार्थी हुशार विद्यार्थ्याशीच मैत्री करू इच्छितो. पण एकदा सामान्य बुद्धीचा मुलगा अभ्यासात आपल्याला मदत होईल, म्हणून हुशार विद्यार्थ्याशीच मैत्री करण्यास धडपडतो. असामान्य बुद्धिमत्ता, असीम सौंदर्य लाभलेल्या व्यक्तीशी मैत्री करायला प्रत्येकजण तयार असतो, पण सामान्य बुद्धी लाभलेल्या, साधारण रूप लाभलेल्या व्यक्तीशी मैत्री करायला स्वतःहून कुणी पुढे येत नाही. बऱयाच जणांची मैत्री ही अतूट असते अगदी चिरकाल टिकते पण अनेकजण शालेय, कॉलेज जीवन संपलं, समाजात वावरताना स्वतःवरच्या जबाबदारीची जाणीव झाली की मैत्रीच्या संबंधापासून दुरावत जातात मग कधीतरी रस्त्यात भेट झाली की नाही तर आपण अनुभवलेल्या अतूट नात्याची आठवण झालीच तर फोनवर विचारपूस करतात. आजच्या काळात फोन, मोबाइल, इंटरनेट यामुळे जग जवळ आले असले तरी माणसे एकमेकांशी दूर जाऊ लागली . पूर्वी लोक पत्र -मैत्री करत आता इंटरनेट-मैत्री करू लागली आहेत. ना ओळखणारी, एकमेकांना न भेटलेली, न बघितलेली माणसंही इंटेरनेटमुळे मैत्री करू. मैत्री ही ठरवून होत नसते ’चल, तू आणि मी मित्र होऊया’असे म्हणून, ठरवून मित्र बनत नसतो. म्हणून तर प्रत्येक सहाय्यही, सहव्यावसायी हा मित्र असू शकत नाही. सहवासाने परिचय होईल, पण मनाच्या तारा जुळतीलच असे नाही.
खरा मित्र कसा ओळखावा ? साधारणत: जगरहाटी अशी असते की ’असतील शिते तर जमतील भुते ’. जोवर आपल्याजवळ भरपूर आहे, तोवर मैत्रीचा, प्रेमाचा देखावा करणारी मंडळी आपल्याभोवताली जमतात. ते आपली खुशामत करतात, पण आपल्या पडत्या काळात ही जमलेली पाखरे भुर्रकन उडून जातात.
खरा मित्र कधी खुशामत करीत नाही. उलट आपण चुकत असलो तर कठोर शब्दांच्या फटकाऱयाने तो आपल्याला जागे करतो. आपल्या विजयाने, यशाने तो आनंदी होतो. आणि मनापासून तो आपल्याला अभिनंदन करतो. अडचणीच्या काळात काहीही न सांगता तो मदतीला धावून येतो. तो परतफेडीची अपेक्षा करत नाही. मित्र लाभणे आणि त्यापासून मैत्रीचे वैभव लाभणे, यापेक्षा परमभाग्य कोणते ? मित्रांनो, खरंच मैत्री अशी करावी, ज्याच्यावर आपला पूर्ण विश्वास असेल, तीच खरी मैत्री होय.









