प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्यातील गुरुवार पेठेतील अर्चना अपार्टमेंटमधील मैत्रिणीच्या फ्लॅटमधून 1 लाख 60 रुपये किंमतीचा सोन्याचा राणीहार व गंठण चोरुन नेल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी सराईत महिला गुन्हेगार सीमा संजय कोकरे वय 40, रा. केसरकर पेठ, सातारा हिला अटक केली आहे. तिच्याकडून चोरीतील सव्वा तोळे वजनाचे दागिने हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान अर्चना अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये ही चोरीची घटना घडली होती. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. गोपनीय माहितीनुसार एका महिलेने ही चोरी केली असल्याचे समोर आल्यानंतर सीमा कोकरे हिला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने गुन्हय़ाची कबुली दिली असून कोकरे ही सराईत गुन्हेगार असून तिच्यावर यापूर्वी देखील मुंबई, सातारा शहर व सातारा तालुका व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तिने चोरलेले दागिने तिच्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.