श्रीनगर / वृत्तसंस्था
काही दिवसांपूर्वीच ‘तिरंग्याचा मान राखणार नाही’ अशी प्रतिज्ञा केलेल्या पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना त्यांच्याच पक्षाच्या तीन नेत्यांनी धक्का दिला आहे. त्यांच्या तिरंग्यासंबंधीच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करत या नेत्यांनी पक्ष सोडल्याची घोषणा सोमवारी केली. टी. एस. बाजवा, हसन अली वाफा आणि बेद महाजन अशी नेत्यांची नावे असून ते ज्येष्ठ नेते आहेत.
तिरंग्यासंबंधीच्या विधानांमुळे मुफ्ती यांची सर्व स्तरांमधून निर्भर्त्सना होत आहे. अनेक राजकीय पक्षही वाचाळपणामुळे त्रस्त आहेत. ‘गुपकार’ या त्यांच्या पाच पक्षांच्या युतीमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूख अब्दुल्ला यांनीही या विधानांवर नापसंती व्यक्त करताना स्वतःला त्यांपासून दूर राखले आहे.









