पीडीपीच्या कार्यालयावर फडकविला तिरंगा : लाल चौकात गदारोळ
वृत्तसंस्था/ श्रीनगर
पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी तिरंगाविरोधी विधान केल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यांच्या विधानाच्या विरोधात केंद्रशासित प्रदेशात अनेक ठिकाणी सोमवारी निदर्शने करण्यात आली आहेत. श्रीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते लाल चौकाच्या क्लॉक टॉवरवर तिरंगा फडकविण्यासाठी जात असताना सुरक्षा कर्मचाऱयांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
गुपकार घोषणेच्या सदस्यांना काश्मीरमध्ये केवळ तिरंगाच फडकणार असा संदेश देऊ इच्छितो असे ताब्यात घेण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. तर जम्मूमध्ये पीडीपीच्या विरोधातील निदर्शनात भाजप कार्यकर्ते मोठय़ा संख्येत तिरंग्यासह पोहोचले होते.
मुफ्ती यांच्या विधानावर भडकलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जम्मू येथील पीडीपी कार्यालयावर तिरंगा फडकवून स्वतःचा विरोध दर्शविला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जोपर्यंत कलम 370 च्या रद्द तरतुदी जोपर्यंत लागू होणार नाहीत तोवर हातात तिरंगा घेणार नसल्याचे मेहबूबा यांनी म्हटले होते.
तिरंगा यात्रेचे आयोजन
मेहबूबा यांच्या विधानावरून श्रीनगरमध्येही गदारोळ झाला आहे. लाल चौकात तिरंगा फडकविण्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांना सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहे. लाल चौकात निदर्शने करणाऱया कार्यकर्त्यांनी गुपकार घोषणेच्या नेत्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. मुफ्ती यांच्या तिरंगाविरोधी विधानानंतर काश्मीर खोऱयात निदर्शने करण्यात आली आहेत.









