पीआरमुळे नाही – टीकाकारांना पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मोदींनी सार्वजनिक जीवनात स्वतःची 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका नियतकालिकाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाबद्दल विस्तृतपणे भूमिका मांडली आहे. आमची धोरणे जनतेच्या अडचणी कमी करणाऱया असतात. याचमुळे जेव्हा मी निर्णय घेतो, तेव्हा हा पंतप्रधान आमच्या अडचणी समजतो, आमच्यासारखा विचार करतो आणि आमच्यापैकीच एक असल्याचे लोकांना वाटते असे उद्गार मोदींनी काढले आहेत. स्वतःची प्रतिमा आणि पीआर मॅनेजमेंटसारख्या आरोपांवर पंतप्रधान मोदींनी अत्यंत आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. लोकांचा हा भरवसा, त्यांची ही संलग्नता प्रत्येक कुटुंबात मोदी आमच्याच कुटुंबाचा आहे ही भावना निर्माण करते. हा विश्वास कुठल्याही पीआर एजेन्सीकडून तयार झालेली धारणा नव्हे. या विश्वासाला मेहनत आणि घामाद्वारे कमावल्याचे मोदी म्हणाले.
लोकांच्या विश्वासानुसार मागील 7 वर्षांमध्ये त्या दिशेने किती यशस्वी ठरलात असा प्रश्न पंतप्रधानांना विचारण्यात आला होता. अनेक वर्षे मी सत्तेच्या वर्तुळापासून दूर राहिलो, जनतेच्या अडचणी, त्यांच्या दैनंदिन समस्या मी समजतो. शौचालयाला कुणीच लोकांची सेवा करण्याच्या पद्धतीत पाहिले नाही, पण शौचालय लोकांची सेवा करण्याची एक पद्धत असल्याचे मला वाटते असे विधान पंतप्रधानांनी केले आहे.
दृढ विश्वास
सत्तेवर आल्यास तीन गोष्टी करण्याचे आश्वासन मी लोकांना दिले होते. “स्वतःसाठी काहीच करणार नाही, मी चुकीच्या उद्देशाने कुठलेच काम करणार नाही. मेहनतीचे नवे उदाहरण प्रस्थापित करेन’’ अशी आश्वासने दिली होती. माझी ही वैयक्तिक प्रतिबद्धता लोक आज देखील पाहतात. अशाप्रकारे लोकांमध्ये विश्वास निर्माण केला जातो. मागील 7 वर्षांमध्ये जे काही केले, त्यामागे माझ्या आणि जनतेमधील हा दृढ विश्वासच आधार राहिल्याचे मोदी म्हणाले.
कृषी कायद्यांवरून विरोधक लक्ष्य
कृषी कायद्यांवर टीका करणाऱया विरोधी पक्षांवर मोदींनी ‘बौद्धिक बेईमानी’ आणि ‘राजकीय देखाव्या’चा आरोप केला आहे. नागरिकांना लाभ पोहोचविण्यासाठी कठोर आणि मोठे निर्णय घेण्याची गरज आहे. हे निर्णय दशकांपूर्वीच घेतले जाणे गरजेचे होते. काही राजकीय पक्ष निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देतात. पण जेव्हा अंमलबजावणीची वेळ येते तेव्हा घुमजाव करतात. स्वतःच्या आश्वासनांवरून अफवा पसरवितात असे म्हणत मोदींनी विरोधी पक्षांना लक्ष्य केले आहे.
देशाचा विचार प्रथम
भारतात राजकारणाने केवळ एकच मॉडेल पाहिले आहे, यांतर्गत पुढील सरकार स्थापन करण्यासाठी सरकारे चालवियणत आली होती. पण देशाच्या निर्मितीसघ्टी सरकार चालविण्यावर माझा विश्वास आहे. स्वतःच्या पक्षाला जिंकविण्यासाठी सरकार चालविण्याची परंपरा राहिली आहे. पण माझा उद्देश देशाला जिंकविण्यासाठी सरकार चालविणे असल्याचे मोदी म्हणाले.
टीकाकारांचा अत्यंत आदर
टीकाकारांना मी खूप महत्त्व देतो. टीकाकारांचा मी मोठा आदर करतो. दुर्देवाने टीकाकारांची संख्या खूपच कमी आहे. बहुतांश लोक केवळ आरोप करतात. वातावरणनिर्मिती करू पाहणाऱया लोकांची संख्या अधिक आहे. याचे कारण म्हणज टीका करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते, संशोधन करावे लागते. पण आजच्या धावपळीच्या जगात बहुतांश लोकांकडे वेळ नसावा असे त्यांनी म्हटले आहे.