जल संरक्षणासाठी पुढाकार : सार्वजनिक नळांमधील गळती रोखणार : नागरिकांना सहभागाचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
पेयजलाचा पुरवठा करणाऱया सार्वजनिक क्षेत्रातील अनेक नळांची किरकोळ दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे. या दुरुस्तीमुळे पाण्याची मोठय़ा प्रमाणात बचत करता येणार आहे. नळातील गळती, पाईप फुटणे, व्हॉल्व बदलणे, लुज फिटिंग, वॉशर बदलणे, पाईप थेडिंग, पाईप बदलणे, सुटे भाग बदलणे इत्यादी कामे करावी लागणार आहेत. ही कामे किरकोळ वाटत असली तरीही यातून मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे मेहता वॉटर टँककडून म्हटले गेले आहे.
मागील काही वर्षांमध्ये उन्हाळय़ातील पाण्याच्या टंचाईची समस्या पाहता मेहता वॉटर टँकतर्फे पाणी वाचविण्याचे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील नळांची दुरुस्ती कंपनीच्या प्लंबर्सकडून करण्यात येणार असून गळती रोखण्यात येणार आहे. यामुळे या अभियानाला ‘स्टॉप द ड्रॉप’ नाव देण्यात आले आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागाद्वारे याला लोकमोहीम करण्याचा प्रयत्न असल्याचे मेहता वॉटर टँककडून सांगण्यात आले.
30 मार्चपर्यंत प्रक्रिया चालणार
एखाद्या सार्वजनिक भागातील नळामध्ये होत असलेल्या गळतीसंबंधी नागरिक कंपनीच्या 7090710710 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून माहिती देऊ शकतात. 30 मार्चपर्यंत ही प्रक्रिया चालणार
आहे.
नागरिकांकडून मिळालेली माहिती कंपनीचा प्रतिनिधी नोंदवून घेत ती प्लंबर्सच्या टीमकडे देणार आहे. प्लंबर्सची टीम गळती होत असलेल्या नळाच्या परिसराला भेट देत दुरुस्तीविषयक पाहणी करणार आहे. दुरुस्तीकार्यासाठी आवश्यक सामग्री उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर प्लंबर्सची टीम ‘स्टॉप द ड्रॉप’अंतर्गत दुरुस्ती करणार आहे. संबंधित नागरिकांना दुरुस्तीकार्य पूर्ण झाल्याची कल्पना देण्यात येणार आहे. संबंधित भागात नागरिकांना पाणी वाचविण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात येणार
आहे.









