वृत्तसंस्था/ बार्सिलोना
डझनभर अजिंक्यपदे, शेकडो गोल आणि अगणित विक्रम नोंदवणाऱया लायोनेल मेस्सीची बार्सिलोनातील शानदार कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेस्सीने बार्सिलोनाला क्लब सोडण्याची इच्छा असल्याचे कळविले आहे. मात्र कायदेशीर बाबींचा त्यात अडथळा येण्याची शक्यता आहे.
सुमारे दोन दशक क्लबमध्ये सेवा बजावल्यानंतर मंगळवारी त्याने क्लब सोडण्याची इच्छा असल्याचे कळविले. या मोसमात बार्सिलोनाला एकही ट्रॉफी जिंकता आली नाही आणि चॅम्पियन्स लीगमधील उपांत्यपूर्व लढतीत बार्सिलोनाला बायर्न म्युनिचकडून 8-2 असा मानाहानिकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर तो खूपच निराश झाला होता. मेस्सीने क्लब सोडणार असल्याचे दस्तावेज पाठविले असल्याचे बार्सिलोनाने स्पष्ट केले. मात्र क्लबला त्याला सोडण्याची इच्छा नसून कायदेशीर बाबीमुळे न्यायालयात संघर्ष होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्याने या क्लबमध्ये राहूनच कारकीर्द संपवावी, असे क्लबने त्याला कळविले आहे. मेस्सीने जो करार केलाय त्यातील एका कलमावर संघर्ष होण्याची शक्यता आहे.
मेस्सीने जी कागदपत्रे पाठविली आहेत, त्यात त्याने एका कलमाचा आधार घेत मोसमाअखेरीस कोणत्याही अडथळय़ाविना क्लब सोडता येत असल्याचे म्हटले आहे. मात्र त्या कलमाची मुदत जूनअखेर संपुष्टात आली असल्याने कायदेशीर सल्ला घ्यावा लागणार असल्याचे क्लबने त्याला सांगितले आहे. स्पेनचा फुटबॉल मोसम मेमध्ये संपुष्टात येतो. पण यावेळी कोरोना महामारीमुळे तो लांबला होता. ‘मेस्सीला जर क्लब सोडायचाच असेल तर त्याला अडचणीत न आणता पूर्ण सहकार्य केले जाईल,’ असे बार्सिलोनाचा माजी स्ट्रायकर गॅरी लिनेकरने ट्विट केले आहे.
33 वर्षीय मेस्सीने विक्रमी सहावेळा बॅलन डीओर पुरस्कार बार्सिलोनामध्ये असताना मिळविला आहे. बार्सिलोनाला त्याने 10 स्पॅनिश लीग आणि चार चॅम्पियन्स लीगची अजिंक्यपदे मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. बार्सिलोनाला बायर्न म्युनिचकडून नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर 11 दिवसांनी त्याने क्लब सोडण्याची घोषणा केली आहे. 2007-08 नंतर पहिल्यांदाच बार्सिलोनाला मोसमात एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. याशिवाय बार्सिलोनाचे काही निर्णयही मेस्सीला पसंत पडले नव्हते आणि त्याविरुद्ध त्याने नाराजीही व्यक्त केली होती. अत्यंत महागडा खेळाडू असल्याने त्याला कोणता क्लब आपल्या ताफ्यात घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. मात्र श्रीमंत असलेला पॅरिस सेंट जर्मेन किंवा मँचेस्टर सिटी या क्लबमध्ये त्याला घेतले जाण्याची चर्चा सुरू आहे.









