वृत्तसंस्था/ माद्रीद
स्पॅनीश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऍथलेटिक बिलबाओ संघाकडून बलाढय़ बार्सिलोना संघाला पराभव पत्करावा लागला. या अंतिम सामन्यातील शेवटच्या 10 मिनिटाच्या कालावधीत बार्सिलोना संघातील हुकमी खेळाडू अर्जेंटिनाच्या मेसीने ऍथलेटिक बिलबाओ संघातील खेळाडू व्हिलालेब्रे याच्या डोक्यावर जोरदार तडाखा मारला आणि 753 सामन्यानंतर प्रथमच त्याला लाल कार्ड मिळाले. या घटनेमुळे मेसीवर दीर्घकालीन निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सेव्हेलिमध्ये रविवारी या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यात ऍथलेटिक बिलबाओने बार्सिलोनाचा 3-2 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. मेसीने या सामन्यात व्हिलालेब्रेच्या डोक्यावर मारल्यानंतर तो जमिनीवर कोसळला. सामन्यातील पंचांनी मेसीला लाल कार्ड दाखविले. बार्सिलोना संघाकडून आतापर्यंत मेसीने 753 सामन्यांत खेळताना त्याला रविवारच्या सामन्यात पहिल्यांदा लालकार्ड दाखविले गेले. मेसीवर कदाचीत बारा सामन्यांची बंदी घातली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.









