बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून दगडाने ठेचले, कराडच्या वाखाणातील घटना
प्रतिनिधी/ कराड
बहिणीला वारंवार त्रास देत मारहाण करणाऱया दाजीचा सख्ख्या मेव्हण्याने गुरुवारी मध्यरात्री गळा आवळत दगडाने ठेचून खून केला. कराडच्या वाखाण भागातील बर्गे मळा शिवारात कापलेल्या भाताच्या मोकळ्या शेतात निर्जनस्थळी थंड डोक्याने हा खून केला. दाजीला संपवल्यानंतर संशयित हल्लेखोर स्वतःहून शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. नितीन नागेश भालशंकर (वय 21, सध्या रा. वाखाण परिसर कराड, मूळ रा. वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे खून झालेल्या दाजीचे नाव आहे.
खून केल्यानंतर मेहुणा रवि रमेश कुडवे (वय 23, सध्या रा. वाखाण परिसर, कराड, मूळ रा. वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) हा पोलिसात हजर झाल्यावर त्याला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराडच्या वाखाण भागात बर्गे मळा येथील हॉटेलवस्ती परिसरात मृत नितीन भालशंकर याचे कुटुंब वास्तव्यास आहे. या परिसरात मुळची वैराग (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील आणखी काही मजूरांची काही कुटूंबे स्थलांतरीत वास्तव्यास आहेत. या कुटुंबातील लोक कराड शहर व परिसरात ऊसतोडणीसाठी व वीटभट्टीवर मजुरीने काम करण्यासाठी जातात. दरम्यान, मृत नितीन भालशंकर दारू पिऊन त्याच्या पत्नीला वारंवार त्रास देत होता. याचा राग मेव्हणा रवि याच्या मनात होता. रवि कुडवे याने दाजी नितीनला वारंवार समजावून सांगितले होते. मात्र नितीनकडून त्रास देणे सुरुच होते.
अखेर दाजीचा कायमचा काटा काढला
वाखाण भागातील बर्गे मळा येथील हॉटेल वस्तीपासून काही अंतरावरील सुजित जाधव यांच्या मालकीचे कापणी झालेल्या भाताचे मोकळे शेत आहे. या शेतात गुरुवारी मध्यरात्री रवि आणि नितीन बसले होते. रविने बहिणीला त्रास देऊ नका, असे पुन्हा एकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न दाजी नितीनला केला. यावरून रात्रीच्या अंधारात दोघांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दोघांतील वाद वाढत गेल्यावर रविने संतापाच्या भरात दाजी नितीन याचा गळा आवळला. नितीन बेशुद्ध झाल्यानंतर संशयिताने त्याच्या छातीवर दगड घालत त्याचा निर्घृण खून केला. रात्रीच्या अंधारात दाजीचा कायमचा काटा काढल्यानंतर रवि काही वेळ तिथेच बसून होता.
खून करून पहाटे पोलिसात हजर
दाजीचा खून केल्यानंतर संशयित रवि थेट कराड शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. शुक्रवारी पहाटे कर्तव्यावर असलेल्या ठाणे अंमलदारांसह पोलिसांना त्याने आपण खून केल्याचे सांगितल्यावर पोलिसांचीही धावपळ उडाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत नेमके काय घडले याची माहिती घेण्यास सुरुवात केली. तोपर्यंत पोलिसांचे दुसरे पथक घटनास्थळाकडे धावले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याबाबत पोलिसांतर्फे हवालदार संजय जाधव यांनी फिर्याद दाखल केली असून संशयित रवि कुडवे यास खुनाच्या गुह्यात अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे तपास करत आहेत.








