प्रतापसिंह राणेंकडून विश्वजितना घरचा अहेर
प्रतिनिधी/ पणजी
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ट नेते तथा आमदार प्रतापसिंह राणे यांनी शेळ मेळावलीतील आयआयटी प्रकल्पास तेथील लोक विरोध का करतात ते सरकारने समजून घ्यावे, असे निवेदन करून आपले पूत्र आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना घरचा अहेर दिला आहे. त्यांच्या या विधानांने विश्वजित उघडे पडले आहेत.
प्रतापसिंह राणे म्हणाले की, आयआयटी हा एक चांगला आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. परंतु तेथील स्थानिक लोक त्यास आक्षेप का घेतात? याचा सरकारने विचार करण्याची गरज आहे. त्याची कारणे कोणती आहेत ते शोधून काढावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. प्रकल्पाविरोधातील जनतेच्या भावना सरकारने विचारात घेणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी प्रकट केले आहे.
त्यांचे पूत्र असलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे आयआयटी प्रकल्पाचे समर्थक असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील या प्रकाल्पाचे समर्थन करत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतापसिंह राणे यांचे निवेदन महत्वाचे आहे. त्यांचे म्हणणे सरकार ऐकते का, त्याकडे दुर्लक्ष करते हे येणाऱया काळात दिसून येणार आहे. आयआयटी प्रकल्पाचा वाद गेले अनेक दिवस चालू असून सिनियर राणे यांनी त्यावर प्रथमच भाष्य केले आहे.









