अमरावती / ऑनलाईन टीम
मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली. हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी चव्हाण यांनी आत्महत्या केली, त्या घटनास्थळी सुसाईड नोट आढळल्याची माहिती समोर आली आहे.
धारणी येथून २५ किमी अंतरावरील हरिसाल येथे दीपाली चव्हाण या गुगामल वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी त्यांनी अनेक नातेवाइकांशी फोनद्वारे संवाद साधला. त्यानंतर चिखलदरा येथील कोषागार कार्यालयात कार्यरत पती राजेश मोहिते यांच्याशी संपर्क साधला. तुम्ही लवकर या, खिचडी करते, असा संवाद त्यांच्यात झाला. लगेचच, तुला शेवटचे पाहायचे आहे, असे म्हणून त्यांनी पतीला लवकर येण्यास सांगितले. त्यामुळे मोहिते हादरुन गेले. वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला नागपूर रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे.
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांची चार पानी सुसाईड नोट सापडली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिण्यात आली आहे. दीपाली यांची वेळोवेळी मुस्कटदाबी केली जात होती. गर्भवती असताना त्या मालूर येथे कच्च्या रस्त्यातून पायी फिरत होत्या. सुट्टी दिली जात नव्हती. पगार रोखून धरला जात होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी या सर्व गोष्टी लिहिल्या आहेत.
दीपाली अतिशय डॅशिंग अधिकारी होत्या. त्यांनी आत्महत्या केली हे अनेक अधिकारी अजूनही मानायला तयार नाहीत. त्यांची हत्या झाल्याचा सूर वनविभागात आहे. मूळच्या सातारच्या असणाऱ्या दिपाली चव्हाण यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र वन सेवा 2014 परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. जिथे माणसं कामं करायला घाबरतात तिथे ही तरूण अधिकारी आपली कर्तव्याची अमिट छाप उमटवत होती. त्यांच्या कामाची सर्वत्र चर्चा होती. रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडले होते. त्यातून त्यांची ओळख “लेडी सिंघम” अशी झाली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









