मेलबर्न / वृत्तसंस्था
मागील 18 महिन्यात स्वतःचे कसोटी संघातील स्थान निश्चित नसलेल्या अजिंक्य रहाणेने प्रेरणादायी नेतृत्वाचे बुलंद इरादे प्रत्यक्षात साकारत भारतीय संघाला येथील दुसऱया कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून एकतर्फी मात देण्यात सिंहाचा वाटा उचलला आणि मालिकेत 1-1 बरोबरीची जोरदार मुसंडी मारली. दुसऱया डावात 70 धावांचे माफक लक्ष्य असताना शुभमन गिल (नाबाद 35) व अजिंक्य रहाणे (नाबाद 27) यांनी संघाला 15.5 षटकात विजय साकार केला.
अवघ्या साडेतीन दिवस चाललेल्या या लढतीत रहाणेने प्रथम झुंजार शतक झळकावले तर नंतर कणखर नेतृत्वाची चुणूक दाखवली. वास्तविक, ऍडलेडमध्ये मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाचे मनोबल खचलेले असणे साहजिक होते. पण, विराट मायदेशी परतल्यानंतर रहाणेने जणू संघात नवा उत्साह सळसळेल, याची दक्षता घेतली आणि याच बळावर भारतीय संघ येथे विजयाचा खरा हकदार ठरला.

भारतीय संघातर्फे जसप्रित बुमराह (27 षटकात 2-54), पदार्पणवीर मोहम्मद सिराज (21.3 षटकात 3-37), रविचंद्रन अश्विन (37.1 षटकात 2-71) व रविंद्र जडेजा (14 षटकात 2-28) या चौकडीने तंत्रशुद्ध, काटेकोर मारा साकारत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अक्षरशः जेरीस आणले.
अलीकडील कालावधीत भारताने विदेशी भूमीत अनेक स्पृहणीय विजय नोंदवले आहेत. मात्र, एमसीजीवरील हा विजय अधिक वैशिष्टय़पूर्ण आहे. विराट कोहलीसारखा जिनियस व मोहम्मद शमीसारखा गोलंदाजीतील जादुगर उपलब्ध नसताना भारताने खेचून आणलेला विजय अर्थातच लक्षवेधी ठरला. विराट पितृत्वाच्या रजेवर मायदेशी रवाना झाला आहे तर शमीला ही लढत दुखापतीमुळे अर्ध्यावरच सोडून द्यावी लागली होती.
रहाणेने येथील शतकापेक्षा 6 वर्षांपूर्वी लॉर्डस्वर झळकावलेले शतक अधिक महत्त्वाचे मानले. भारतीय चाहत्यांच्या दृष्टीने मात्र मेलबर्नमधील त्याची झुंजार खेळी अधिक स्पृहणीय ठरली आहे. रहाणे कराटेतही माहीर असून उमेदीच्या कालावधीत त्याने टेन्थ डॅन ब्लॅकबेल्टपर्यंत मजल मारली होती.
बुमराहची रणनीती फळली
मंगळवारी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळात बुमराहला जुन्या चेंडूवर फारसा सूर सापडत नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर रहाणेने 3 षटकात त्याचा स्पेल थांबवला व नव्या चेंडूवर त्याला ताजेतवाने राखण्याची रणनीती अमलात आणली. पुढे, नवा चेंडू घेतल्यानंतर बुमराहने कमिन्सला बाद करत कमिन्स-ग्रीनची 36 षटके किल्ला लढवणारी भागीदारी फोडली. एका अप्रतिम उसळत्या चेंडूवर त्याने कमिन्सला झेल देणे भाग पाडले. जबडय़ाच्या रोखाने येणाऱया चेंडूवर अंतिम क्षणी कमिन्सला नजर हटवावी लागली आणि दुसऱया स्लीपमधील मयांकने सोपा झेल टिपला.
दुसऱया नव्या चेंडूवरच कॅमेरुन ग्रीनची (146 चेंडूत 45 धावा) खेळीही संपुष्टात आणली गेली. ग्रीनचा सिराजच्या गोलंदाजीवर पूल मारण्याचा प्रयत्न फसला आणि मिडविकेटवर रविंद्र जडेजाने सहज झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही 4 कसोटी सामन्यांची मालिका संपन्न झाल्यानंतर दीड महिन्यांच्या कालावधीत भारतीय संघ चेपॉकवर कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरेल, त्यावेळी विराटकडे पुन्हा एकदा नेतृत्वाची कवचकुंडले असू शकतील. पण, कर्णधार रहाणेचे येथील झुंजार योगदान त्यावेळी देखील कोणीही विसरु शकणार नाही.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : सर्वबाद 195
भारत पहिला डाव : सर्वबाद 326.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : (6 बाद 133 वरुन पुढे) कॅमेरुन ग्रीन झे. जडेजा, गो. सिराज 45 (146 चेंडूत 5 चौकार), पॅट कमिन्स झे. अगरवाल, गो. बुमराह 22 (103 चेंडूत 1 चौकार), मिशेल स्टार्क नाबाद 14 (56 चेंडू), नॅथन लियॉन झे. पंत, गो. सिराज 3 (15 चेंडू), जोश हॅझलवूड त्रि. गो. अश्विन 10 (21 चेंडू). अवांतर 8. एकूण 103.1 षटकात सर्वबाद 200.
गडी बाद होण्याचा क्रम
1-4 (बर्न्स, 3.1), 2-42 (लाबुशाने, 17.5), 3-71 (स्मिथ, 32.2), 4-98 (वेड, 43.6), 5-98 (हेड, 46.1), 6-99 (टीम पेन, 47.4), 7-156 (कमिन्स, 82.5), 8-177 (ग्रीन, 90.6), 9-185 (लियॉन, 96.4), 10-200 (हॅझलवूड, 103.1).
गोलंदाजी
जसप्रित बुमराह 27-6-54-2, उमेश यादव 3.3-0-5-1, मोहम्मद सिराज 21.3-4-37-3, रविचंद्रन अश्विन 37.1-6-71-2, रविंद्र जडेजा 14-5-28-2.
त्या जखमा ‘ताज्या’ होत्या. म्हणूनच….
भारतासमोर दुसऱया डावात विजयासाठी 70 धावांचे जेमतेम आव्हान होते. पण, 10 दिवसांपूर्वीच 36 धावांमध्ये डाव खुर्दा झाला असल्याने संघाभोवती साशंकतेचे वलय होते. त्या जखमा ताज्या असल्याने भारतीय फलंदाज दुसऱया डावात जणू ताकही फुंकून पित होते. मयांक व चेतेश्वर स्वस्तात गारद झाल्याने त्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या. अर्थात, यावेळी शुभमन गिल (नाबाद 35) व कर्णधार रहाणे (नाबाद 27) यांनी धीरोदात्त खेळी साकारली व साशंकतेचे सर्व मळभ एकहाती दूर केले.
शुभमन गिल व मोहम्मद सिराज या युवा खेळाडूंनी साकारलेली झुंजार खेळी, त्यांचे योगदान मी अधिक महत्त्वाचे मानतो. या लढतीत स्पृहणीय विजय साकारुन देणाऱया सहकारी खेळाडूंचे मनापासून अभिनंदन.
-भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे
अश्विन माझ्याविरुद्ध सरस ठरला, माझा बचाव भेदण्यात यशस्वी ठरला, हे मान्य करावेच लागेल. त्याने मला सातत्याने दडपणाखाली ठेवले. आजवर कोणताही फिरकीपटू मला इतक्या दडपणात राखू शकलेला नव्हता.
-ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ
मेलबर्न कसोटीतील हा पराभव खुल्या दिलाने स्वीकारावाच लागेल. पण, या पराभवामुळे विचलित होत फलंदाजी क्रमात काही बदल करण्याची गरज आहे, असे मला अजिबात वाटत नाही. फक्त आम्ही आमच्या लौकिकाला साजेशी फलंदाजी साकारायला हवी.
-ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन
विराट कोहली, रोहित शर्मा, इशांत शर्मा व शमी यांच्याशिवाय कसोटी सामना जिंकणे हा मोठा पराक्रम आहे. पहिल्या कसोटीतील दारुण अपयश पचवून संघाने येथे जो जिगरबाज विजय खेचून आणला, ते निश्चितच प्रशंसनीय आहे.
-माजी कर्णधार सचिन तेंडुलकर
पूर्ण संघाने साकारलेला देदीप्यमान खेळ विशेष लक्षवेधी आहे. कर्णधार या नात्याने अजिंक्य रहाणेने दिलेले योगदान या विजयात माझ्या दृष्टीने लाख मोलाचे आहे. या विजय पुढेही संघाचे मनोबल उंचावणारा ठरेल.
-नियमित कर्णधार विराट कोहली
यापूर्वी, पहिल्या कसोटीत 36 धावात डाव उखडला जाणे दुर्मिळ होते. त्यानंतर भारताने येथे उत्तम बाजी मारली. पण, या मालिकेत आणखी 2 कसोटी सामने आहेत. विजयाने हुरळून न जाता भारताने संयम व आक्रमणाचा मिलाफ साधत आगेकूच कायम राखावी.
-माजी कर्णधार बिशनसिंग बेदी
कर्णधार अजिंक्य रहाणे व संघसहकाऱयांच्या योगदानाचे करावे तितके कौतुक कमी ठरेल. नियमित कर्णधार संघात नसतानाही भारताने मिळवलेले यश लक्षवेधी ठरते.
-विश्वचषक जेते कर्णधार कपिलदेव
रहाणेचे शतक हा सामन्यातील टर्निंग पॉईंट : रवी शास्त्री
भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून धुव्वा उडवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या विजयाचे श्रेय हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या झुंजार शतकाला दिले. रहाणेच्या 112 धावांच्या झुंजार खेळीमुळे भारताने पहिल्या डावाअखेर 131 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी प्राप्त केली आणि त्यानंतर यजमानांना 200 धावांच्या आत गुंडाळत 70 धावांचा यशस्वी पाठलाग केला. रहाणे क्रीझवर होता, तो दिवस फलंदाजांसाठी खूपच प्रतिकूल होता, असे निरीक्षण शास्त्री यांनी नोंदवले.
विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वात काय फरक आहे, या प्रश्नावर शास्त्राr म्हणाले, विराट व रहाणे या दोघांनाही खेळाची उत्तम जाण आहे. विराट अतिशय तळमळीने खेळतो. दुसरीकडे, अजिंक्य हा अतिशय शांत व एकाग्र असतो. विराट त्याची आक्रमकता चेहऱयावर दर्शवतो. अजिंक्य शांत राहणे पसंत करतो. पण, आपल्याला काय साध्य करायचे आहे, याची त्याने खोल जाणीव ठेवलेली असते.
भारताचे ऑस्ट्रेलियातील कसोटी विजय
धावांचा फरक / ठिकाण / हंगाम
222 धावा / मेलबर्न / 1977-78
डाव व 2 धावा / सिडनी / 1977-78
59 धावा / मेलबर्न / 1980-81
4 गडी / ऍडलेड / 2003-04
72 धावा / पर्थ-वाका / 2007-08
31 धावा / ऍडलेड / 2018-19
137 धावा / मेलबर्न / 2018-19
8 गडी / मेलबर्न / 2020-21
बॉक्स
भारताचे विदेशातील सर्वाधिक कसोटी विजय
ठिकाण / सामने / विजय / पराभव / अनिर्णीत
कोलंबो / 9 / 3 / 2 / 4
पोर्ट ऑफ स्पेन / 13 / 3 / 3 / 7
किंग्स्टन / 13 / 3 / 6 / 4 मेलबर्न / 13 / 3 / 8 / 2









