गाडीवरचा ताबा सुटल्याने 100 फुट कोसळली इर्टिगा
वार्ताहर/ आनेवाडी
जावली तालुक्यातील पर्यटन व तीर्थक्षेत्रचा क दर्जा असलेल्या मेरुलिंग (नरफदेव) येथील महिला व पुरुष ग्रामस्थ रविवारी सकाळी आठच्या दरम्यान रेशनिंग धान्य आणण्यासाठी डोंगराच्या पायथ्यालगत असणाऱया मोरघर व दरेखुर्द येथे इर्टिगा कारमधुन जात असताना मेरुलिंग घाटातील तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार शंभर फुट खोल दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर अन्य एक सायगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारावेळी निधन झाले. अन्य पाच प्रवासी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व सातारा येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटनास्थळावरुन व पोलीस प्रशासनाच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या रेशनिंग धान्य वाटप सुरु असल्याने मेरुलिंगमधील लोकांचे धान्य मोरघर व दरे खुर्द येथे वाटप करण्यात येते. ते आणण्यासाठी इर्टिगा कार क्रमांक एम एच 43 एएल 7946 मधुन सकाळी निघालेल्या कारमध्ये एकूण आठ प्रवासी प्रवास करीत होते. यावेळी या तीव्र वळणावर आल्यानंतर कार चालकाचा ताबा सुटल्याने कार शंभर फुट खोल खाली कोसळली. कार पलटय़ा घेत खालील बाजूस असणाऱया रस्त्यावर येवून कोसळली. अपघात एवढा भयंकर होता कि कार पूर्णपणे दबली गेली असल्याने मृतदेह व जखमी लोकांना बाहेर काढताना स्थानिक ग्रामस्थांना खुप प्रयत्न करावे लागले. यासाठी लोखंडी पहारेच्या सहाय्याने दरवाजे उघडण्यात आले.
या अपघातातील मृतामध्ये शिवाजी जगन्नाथ साबळे (वय 40), लिलाबाई गणपत साबळे (वय 55), सागर सर्जेराव साबळे (वय 32) सर्व रा. मेरुलिंग (नरफदेव ता. जावली) यांचा समावेश आहे. अन्य जखमीमध्ये माजी उपसरपंच वसंत साबळे (वय 55), पांडुरंग साबळे (वय 56), महेश साबळे (वय 19), सचिन साबळे (वय 28) व शोभा भिलारे (वय 40) यांचा समावेश आहे. यातील काहींना सायगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करून घरी सोडण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचाराकरिता सातारा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळाची सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी पाहणी केली. त्याचबरोबर जखमी लोकांची सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून विचारपुस करीत पुढील तपास करण्याचे आदेश दिले.
कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कदम व सहाय्यक फौजदार उदय शिंदे घटनास्थळाची पाहणी केली. या अपघाताची नोंद कुडाळ पोलिसांत झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम व उदय शिंदे करत आहेत.
स्वस्त धान्य पडले महागात
श्री शंकराचे जागृत देवस्थान असणाऱया उंच डोंगरावर तीर्थक्षेत्र मेरुलिंग आहे. प्रशासनाच्या अनेक सोयीसुविधा येथे पोहाचल्या नाहीत. त्यामुळे मेरुलिंग तसेच धनगरपेढा विकासापासून दुर्लक्षित आहे. शासनामार्फत दिले जाणारे स्वस्त धान्याचे याठिकाणी वितरण केले जात नाही. ते नेहण्यासाठी येथील नागरिकांना मोरघर किंवा दरेखुर्द येथे यावे लागते. रविवारी झालेली दुर्घटनेत धान्य आणण्यासाठी निघालेल्यांच्या जीवावर उठली आहे. त्यामुळे हे स्वस्त धान्य मेरुलिंगकरांना खूप महागाचे पडले आहे. याठिकाणीच धान्याचे वितरण व्हावे, अशी मागणी नागरिक करु लागले आहेत.








