कागदपत्रे बनावट असल्याचा संशय : दहशतवाद विरोधी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / पणजी
गुन्हा अन्वेषण विभागाच्या दहशतवाद विरोधी पोलीस पथकाने (एटीएस) गोव्यात थांबलेल्या बिगर गोमंतकीय कामगार आणि भंगार अड्डय़ांतील लोकांची कसून चौकशी सुरू केली असून गुरुवारी मेरशी येथील भंगार अड्डय़ावर टाकलेल्या छाप्यात सहा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.
गोव्यातून परराज्यातील आपल्या घरी जाण्यासाठी सुमारे 1 लाख 20 हजार स्थलांतरीत मजूरांनी जिल्हाधिकाऱयांच्या कार्यालयात नोंदणी केली होती. झारखंड, ओडिशा तसेच उत्तरप्रदेश आणि काश्मीरपर्यंतच्या कामगारांसाठी खास ट्रेन रवाना करण्यात आली. मात्र पश्चिम बंगालमधील कामगारांची नोंदणी फार कमी झाली होती. कोलकाता तसेच पश्चिम बंगालमधील इतर कर्मचारी गोव्यातच असून त्यांची कसून चौकशी सुरू झाली आहे.
भोम येथेही सापडले होते बांगलादेशी घुसखोर
यापूर्वी भोम येथील भंगार अडडय़ावर पोलिसांनी छापा टाकला होता तेव्हाही काही बंगाली सापडले होते. भारतीय नागरिक असल्याचा कोणताच दस्ताऐवज नसल्याचे आढळल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा मेरशी आणि कोलवाळ येथेही त्यांचे बांगलादेशहून आलेले नातेवाईक असल्याचे उघड झाले.
गुरुवारी फिरगेंभाट मेरशी येथील भंगार अड्डय़ावर छापा टाकण्यात आला तेव्हा सहा बांगलादेशी नागरिक सापडले. त्यांनी आपण भारतीय असल्याचे दर्शविण्यासाठी आधारकार्ड आणि निवडणूक ओळखपत्र आदी दस्तऐवजाची फोटो कॉपी सादर केली आहे. ती बनावट असल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. एस.आय.टी. चौकशी विभाग आणि जुने गोवे पोलीस स्थानकाचे पोलीस पुढील तपास करत आहेत.









