‘आशिया चषका’त दमदार कामगिरी अन् त्यानंतर ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या मालिकेत गाजविलेलं वर्चस्व अशी जोम आणणारी, उत्साह वाढविणारी पार्श्वभूमी घेऊन भारतीय संघ विश्वचषकात पाऊल ठेवेल…परंतु आदर्श संघ कसा घडवायचा, त्याकरिता कुणाला खेळवायचं नि कुणाला गाळायचं याबाबतीत या संघासमोर असलेल्या समस्या नजरेआड करून चालणार नाहीत…
011…भारतीय संघानं विश्वचषक शेवटचा उचलला तो त्या साली…तेव्हाही ती स्पर्धा भारतातच झाली होती अन् नेतृत्व होतं महान कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडे. त्यावेळी धोनीचे डावपेच किती प्रभावी ठरले होते आणि अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून 28 वर्षांनंतर विश्वचषक कसा परत आणला होता त्याच्या गोड आठवणी अजूनही अनेकांच्या मनात जाग्या असतील…त्यानंतर एका तपानं भारत पुन्हा क्रिकेटच्या जगतातील त्या ‘महाकुंभा’चं आयोजन करतोय अन् साहजिकच माहीच्या सदर ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या भारी वजनदार अपेक्षांचा भार असेल तो कर्णधार रोहित शर्माच्या खांद्यांवर…अनुभव, क्षमता नि कौशल्य या निकषांवर यजमान राष्ट्र कित्येकांहून भारी अन् विश्वचषकाच्या सर्वांत दमदार दावेदारांपैकी एक…पण ’मेन इन ब्ल्यू’ला ‘आयसीसी’ विजेतेपदाच्या बाबतीत मागील 10 वर्षांपासून सतावणारा दुष्काळ यावेळी संपवता येईल का ?…
भारत विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुऊवात चेन्नईतून करेल ती 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविऊद्ध…मात्र सारे जण आतुरतेनं वाट पाहत असतील ती अहमदाबाद येथे 14 ऑक्टोबर रोजी 1 लाख 32 हजार प्रेक्षकांसमोर खेळविल्या जाणार असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या ‘हाय-प्रोफाइल’ लढतीची…अनुभवाच्या आघाडीवर भारतीय संघाला तोडीस तोड संघ कमीच. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यासारखे काही खेळाडू हे दोन किंवा अधिक विश्वचषकात झळकलेले. खेरीज के. एल. राहुल, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हेही यापूर्वी या स्पर्धेत खेळलेत. त्या साऱ्यांचा अनुभव निश्चितच संघाला खूप प्रभावी बनवू शकतो…
ताकदवान फलंदाजी…
2011 च्या धोनीच्या नेतृत्वाखालील संघानंतरची भारताची सर्वोत्तम फलंदाजी सध्याच्या रोहित शर्माच्या चमूकडे आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये…स्वत: रोहित, शुभमन गिल, विराट कोहली, दुखापतीतून सावरल्यानंतर फॉर्मात आलेला के. एल. राहुल, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पंड्या…ही फळी कुणाचेही मनसुबे उधळवून लावण्याची ताकद बाळगते…वरीलपैकी कुणालाही बदलण्याची वेळ आल्यास त्यासाठी तितकेच दमदार मोहरे आहेत ते ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या रुपानं…
मागील बऱ्याच काळावरून नजर फिरविल्यास भारताच्या ताफ्यात एकाच वेळी इतके ‘सुपरहिरो’ कधी भरलेले नव्हते हे मान्य करावंच लागेल. शिवाय आपल्याकडच्या खेळपट्ट्या कशा फलंदाजांना पोषक, पाटा असतील ते सर्वांना माहितंय. त्याची व्यवस्थित चुणूक ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनं आणून दिलीय. त्यामुळं किक्रेट रसिकांना अपेक्षा असेल ती दिवाळीपूर्वी मैदानात जबरदस्त आतषबाजी पाहायला मिळण्याची, धावांचे डोंगर उभे राहण्याची…याबाबतीत सर्वांच्या नजरा टिकून असतील त्या शुभमन गिलवर. त्यानं यंदाच्या वर्षात 1200 हून अधिक धावांचा रतीब ओतलेला असून गिलचा फॉर्म हा भारताच्या सर्वांत मोठ्या ‘प्लस पॉईंट’पैकी एक. त्यामुळं शिखर धवनसारख्या जबरदस्त ताकदीच्या खेळाडूची अनुपस्थिती संघाला जाणवलेली नाहीये…
तितकंच दिलासादायक के. एल. राहुलचं वेळेवर सावरणं, विश्वचषकापूर्वी पूर्ण तंदुऊस्त होणं…आशिया चषकात तो विलक्षण फॉर्मात राहिला. त्याचं सरताज राहिलं ते पाकिस्तानविऊद्धचं शतक. राहुलचा आपल्याला भरपूर फायदा होईल…लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या बाबतीत भारताकडे एक जबरदस्त मोहरा आहे तो म्हणजे विराट कोहली. त्याच्यावरही सर्वांचं भरपूर लक्ष असेल. कारण तो सचिन तेंडुलकरच्या 47 एकदिवसीय शतकांच्या अगदी जवळ पोहोचलाय आणि ‘मास्टर ब्लास्टर’ला मागं टाकण्यासाठी विराटला गरज आहे ती आणखी तीन शतकांची…
‘स्वदेशी’ अनुकूलता…
स्पर्धा ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळा’ची (आयसीसी) असली, विविध ठिकाणं आणि परिस्थिती यांचा अभ्यास करणारे ‘क्युरेटर्स’ त्यांचे राहणार असले, तरी शेवटी मायभूमीत खेळण्याची अनुकूलता भारतीय संघाकडे राहीलच यात शंका नाही. या पार्श्वभूमीवर रोहित शर्माच्या हाती असेल ती विश्वचषक जिंकण्याची सर्वांत उत्कृष्ट संधी…काही ठिकाणी भरपूर दवाचा सामना करावा लागू शकतो ही बाबही दुर्लक्षून चालणार नाही. अशा परिस्थितीत जर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताला उतरावं लागलं, तर त्यांच्याइतका तडाखेबंद प्रतिस्पर्धी दुसरा सापडणं कठीण…
प्रभावी फिरकी मारा…
अनेक विदेशी संघांना चिंता सतावत असेल ती भारतीय खेळपट्ट्dयांवर आपल्या फिरकी माऱ्याला तोंड कसं द्यावं याची…हा विभाग कागदावर प्रभावी दिसत असला, तरी रविचंद्रन अश्विन नि रवींद्र जडेजा हे दोन दिग्गज गोलंदाज अशा खेळपट्ट्यांवर कशी कामगिरी करतात ते पाहावं लागेल. अश्विनला नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत फारशी चमक दाखविता आलेली नसली, तरी त्याला अचानक सूर गवसून तो कधी उत्पात घडवेल हे सांगणं कठीण. शिवाय रविचंद्रन प्रयोगशील ऑफस्पिनर असल्यानं डावखुऱ्या फलंदाजांना, खास करून त्यांचा मोठ्या प्रमाणात भरणा असलेल्या कांगारुंना सतावू शकतो. अश्विनला संधी मिळालीय ती अक्षर पटेलला झालेल्या दुखापतीमुळं…
परंतु गेल्या एका वर्षात बहुतांश काळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळविल्यानंतर यजुवेंद्र चहलला देण्यात आलेला डच्चू हा खटकणारा. भारतीय खेळपट्ट्यांवर चहलसारखा लेगस्पिनर फिरकीसमोर ढासळणाऱ्या संघांविरुद्ध आपल्या कामी आला असता हे नजरेआड करता येणार नाही. त्याला बाजूला सारून तीन डावखुऱ्या फिरकीपटूंची करण्यात आलेली निवड एक बाब प्रकर्षानं दाखवून जाते अन् ती म्हणजे पर्यायांचा अभाव…अलीकडचा फॉर्म, सातत्यानं टिपलेले बळी पाहता कुलदीप यादवची प्रत्येक सामन्यात वर्णी लागणं स्वाभाविक. अचानक फॉर्म गमावला किंवा दुखापत झाली, तरच त्याच्या जागी बाकीच्यांचा विचार करावा लागेल…
अश्विनचे मागचे पराक्रम पाहता प्रतिस्पर्धी गोटातील अनेक फलंदाजांना त्याची धास्ती वाटेल. परंतु त्याचबरोबर हेही तिककंच खरं की, चांगल्या खेळपट्ट्dयांवर काही वेळा त्याच्यावर संघर्ष करण्याची वेळ आलीय. तरी देखील ऑस्ट्रेलियासारख्या काही संघांविरुद्ध खेळताना फलंदाजांवर ‘माईंड गेम’चा वापर करून दबाव आणण्याचा अश्विनचा जो हातखंडा आहे तो त्याचं पारडं जड बनवून जातो…तीच गोष्ट अचूक मारा करून फलंदाजांना जखडून ठेवण्याची ताकद बाळगणाऱ्या जडेजाची. तो पोषक खेळपट्ट्यांवर निश्चितच संहारक ठरू शकत असला, तरी पाटा खेळपट्ट्यांवर तितकाच महागही ठरू शकतो…
जडेजा आणि अश्विन हे दोघेही सक्षम फलंदाज. कसोटीत त्यांची फलंदाजी अनेकदा भारताला तारक ठरलीय. हे अष्टपैलूत्व त्यांचं मोल आणखी वाढवून जातं. परंतु जडेजाच्या सध्याच्या ‘स्ट्राइक रेट’वर नजर टाकल्यास एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजी करताना तो फारसा सुरात दिसलेला नाही. दुसरीकडे अश्विन मोलाचं योगदान देऊ शकत असला, तरी तो ‘पॉवर हिटर’ नाही…
वेगवान तोफखाना…
वेगवान गोलंदाजीच्या आघाडीवर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर यांचा समावेश असलेला विभाग हा सध्याच्या जगातील सर्वोत्तम माऱ्यांपैकी एक…नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत त्यांनी आपला इंगा व्यवस्थित दाखविलाय अन् ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या एकदिवसीय मालिकेतही त्यांचा दणका दिसून आल्याशिवाय राहिलेला नाहीये…एका बाजूनं दुखापतीतून सावरलेल्या बुमराहनं दमदार पुनरागमन केलंय, नवीन चेंडूवर नेहमीप्रमाणं बळी मिळविलेत. दुसरीकडे, सिराजनं ‘आशिया कप’च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजीचा एकहाती धुव्वा उडवून दाखविलाय…आशिया चषकात केवळ एकच सामना खेळता आलेल्या शमीनं ऑस्ट्रेलियाविरु द्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाच बळी मिळवून आपलं महत्त्व पुरेपूर सिद्ध केलंय…ठाकुरकडे भागीदारी तोडण्याची अन् मधल्या षटकांमध्ये बळी घेण्याची क्षमता असून त्यानं मागील काही एकदिवसीय सामन्यांमध्ये ही जबाबदारी इमाने इतबारे पार पाडलीय…
काही वेळा बरेच पर्याय उपलब्ध असणं ही देखील चांगली गोष्ट नसते आणि ती संघासमोर गोंधळाची परिस्थिती निर्माण करू शकते. गोलंदाजीच्या बाबतीत ही समस्या फारशी भेडसावणार नसली, तरी फलंदाजीत श्रेयस अय्यरला खेळवायचे की, इशान किशनला हा निर्णय घेणं सोपं जाणार नाहीये. किशननं संघ व्यवस्थापनाकडून त्याच्यावर सोपविण्यात आलेली प्रत्येक भूमिका यशस्वीपणे पार पाडलीय. शिवाय तो चांगलं यष्टिरक्षणही करू शकतो. परंतु आता के. एल. राहुल यष्टिरक्षणाबरोबर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सज्ज असल्यानं त्याच्यावर बाहेर बसण्याचा प्रसंग ओढवू शकतो…पण इशान किशनला वगळणं म्हणजे पहिल्या पाच फलंदाजांमधील एकमेव डावखुऱ्या पर्यायाला गाळणं आणि विरोधी गोलंदाजांवर दबाव आणण्याच्या दृष्टीनं उपयुक्त ‘राईट-लेफ्ट कम्बिनेशन’लाही फाटा देणं. त्यामुळं योग्य संघरचना जुळवून आणणं हे निश्चितच भारतीय ‘थिंक टँक’समोर एक आव्हान असेल !
संपूर्ण संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन व सूर्यकुमार यादव.









