वृत्तसंस्था/ टोरँटो
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या टोरँटो मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाचा टॉप सीडेड डॅनियल मेदव्हेदेव तसेच ग्रीसचा सिटसिपेस यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
गुरुवारी झालेल्या सामन्यात मेदव्हेदेवने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थचा 6-2, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. दुसऱया एका सामन्यात ग्रीसच्या तृतीय मानांकित सिटसिपेसने कॅचेनोव्हवर 6-3, 6-2 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या विजयासाठी सिटसिपेसने आपला 23 वा वाढदिवस साजरा केला. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कॅचेनोव्हने रौप्यपदक पटकाविले होते. सिटसिपेस आणि नॉर्वेचा कास्पर रुड यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. नॉर्वेच्या रुडने सर्बियाच्या लेजोव्हिकवर 6-4, 6-3 अशी मात करत पुढील फेरी गाठली. अमेरिकेच्या जॉन इस्नेरने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना चौथ्या मानांकित रशियाच्या रुबलेव्हचे आव्हान 7-5, 7-6 (7-5) असे संपुष्टात आणले. फ्रान्सच्या मोनफिल्सने अमेरिकेच्या टिफोईवर 6-1, 7-6 (7-2) तसेच अमेरिकेच्या ओपेल्काने किरगॉईसवर मात करत पुढील फेरी गाठली. स्पेनच्या ऍग्युटने शुवार्त्झमनचा 6-3, 3-6, 7-5 असा पराभव केला.









