2009 नंतर स्पर्धा जिंकणारा पहिला रशियन,थिएमचा पुन्हा स्वप्नभंग, कूलहॉफ-मेक्टिक दुहेरीत अजिंक्य
वृत्तसंस्था / लंडन
रशियाच्या चौथ्या मानांकित डॅनील मेदव्हेदेवने एका सेटची पिछाडी भरून काढत अमेरिकन ओपन चॅम्पियन डॉमिनिक थिएमचा पराभव करून एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. आजवरच्या कारकिर्दीतील त्याचे हे सर्वोत्तम यश आहे.
या अंतिम लढतीत तिसरा मानांकित थिएम मेदव्हेदेवपेक्षा सरस खेळत होता. पण नंतर मेदव्हेदेवने पकड मिळवित थिएमवर चुरशीच्या लढतीत 4-6, 7-6 (7-2), 6-4 अशी मात करून पहिल्यांदाच या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील अव्वल तीन खेळाडूंना पराभूत करणारा मेदव्हेदेव हा पहिला खेळाडू बनला आहे. त्याने ही स्पर्धा पाच वेळा जिंकणाऱया नोव्हॅक जोकोविचचा आणि नंतर द्वितीय मानांकित राफेल नदालचा पराभव केला. 24 वर्षीय मेदव्हेदेवने आता सलग दहा सामने जिंकले असून याआधी पॅरिस मास्टर्समधून त्याची विजयी घोडदौड सुरू झाली होती. गेल्या वर्षी त्याने या स्पर्धेत पदार्पण केले आणि त्यावेळी त्याला एकही सामना जिंकता आला नव्हता.
थिएमसाठी मात्र हा पराभव वेदनादायक ठरणारा आहे. कारण गेल्या वर्षीही त्याला अंतिम फेरीत स्टेफानोस सित्सिपसकडून पराभव स्वीकारावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. ‘अतिशय उत्कृष्ट सामना होता. आजवरच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम विजयापैकी हा एक विजय होता. त्यासाठी दोन तास 42 मिनिटे एका उत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध संघर्ष करावा लागला,’ असे मदेव्हेदेवने सांगत थिएमच्या कामगिरीचेही कौतुक केले. ‘तू आतापर्यंत जे अप्रतिम यश मिळवलेस त्याबद्दल तुझे अभिनंदन. टेनिसच्या इतिहासात तुझी याआधीच नोंद झालेली आहे. यावर्षी तू ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलीस आणि अविश्वसनीय असे यश मिळवलेस. यापुढेही मोठय़ा स्पर्धांत आपली एकमेकांशी गाठ पडत राहील, अशी मी आशा करतो,’ असे मेदव्हेदेव थिएमचे कौतुक करताना म्हणाला.
2009 नंतर एटीपी फायनल्स जिंकणारा मेदव्हेदेव हा पहिला रशियन टेनिसपटू आहे. त्यावर्षी लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच एटीपी फायनल्स स्पर्धेत रशियाच्या निकोलाय डेव्हिडेन्कोने जेतेपद पटकावले होते. पुढील वर्षीपासून ही स्पर्धा इटलीतील तुरिन येथे घेतली जाणार आहे.
दुहेरीत वेस्ली कूलहॉफ व निकोला मेक्टिक विजेते
वेस्ली कूलहॉफ व निकोला मेक्टिक या मोसमात प्रथमच एकत्र खेळत असून एटीपी फायनल्सचे जेतेपद पटकावत त्यांनी मोसमाची उत्तम अखेर केली. अंतिम लढतीत या जोडीने सातव्या मानांकित जुर्गेन मेल्झर (ऑस्ट्रिया) व एदुआर्द रॉजेर व्हॅसेलिन (फ्रान्स) यांच्यावर 6-2, 3-6, 10-5 अशी मात केली. पाचवी मानांकित कूलहॉफ-मेक्टिक ही डच-क्रोएशियन जोडी या मोसमात तिसऱया प्रयत्नात यशस्वी ठरली आहे. याआधी या जोडीला मार्सेली व यूएस ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागल्याने उपविजेतेपद मिळाले होते. परतीच्या फटक्यावर यश मिळविण्याचे सातत्य, हे या जोडीचे वैशिष्टय़ आहे. जानेवारीपासून एकत्र आल्यानंतर त्यांनी हा गुण वारंवार दाखवून दिला असून येथेही त्यांनी त्याचाच कित्ता गिरविला. विजेत्या जोडीने पहिला सेट जिंकून आघाडी घेतल्यानंतर मेल्झर-रॉजेर व्हॅसेलिन यांनी दुसऱया सेटमध्ये एकमेव ब्रेक मिळविला. तो सामना टायब्रेकरवर नेण्यास पुरेसा ठरला. टायब्रेकरमध्ये मेक्टिकने पुढाकार घेत नेटजवळ जास्तीत जास्त परतीचे फटके मारत 9-5 गुणावर झेप घेतली आणि पहिल्या चॅम्पियनशिप पॉईंटवर मेल्झरने दुहेरी चूक केल्यानंतर कूलहॉफ-मेक्टिकने जल्लोष सुरू केला. स्वप्न साकार झाल्याची भावना मेक्टिकने व्यक्त केली. एकत्र खेळताना मिळविलेले हे पहिलेच अजिंक्यपद असून वर्षाची अखेर जेतेपदाने करता आली याचा आनंद वाटतो, असेही तो म्हणाला.