वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या इंडियन वेल्स मास्टर्स पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा चौथा मानांकित राफेल नदालने एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली पण रशियाचा टॉप सीडेड डॅनियल मेदवेदेव्ह आणि कॅनडाचा डेनिस शॅपोव्हॅलोव्ह यांचे आव्हान संपुष्टात आले.
सोमवारी येथे झालेल्या सामन्यात चौथ्या मानांकित नदालने ब्रिटनच्या डेन इव्हान्सचा 7-5, 6-3 असा पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले. नदालने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत विक्रमी 21 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून त्याने गेल्या जानेवारीत ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. 2022 च्या टेनिस हंगामामध्ये नदालने आतापर्यंत सलग 17 सामने जिंकले असून त्याने रॉजर फेडरर आणि पीट सांप्रास यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. नदालचा पुढील फेरीतील सामना अमेरिकेच्या ओपेल्काशी होणार आहे. दुसऱया एका सामन्यात ओपेल्काने कॅनडाच्या डेनिस शॅपोव्हॅलोव्हचे आव्हान 6-7 (4-7), 6-3, 6-4 असे संपुष्टात आणले. टॉप सीडेड आणि विद्यमान अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम विजेत्या मेदवेदेव्हला फ्रान्सच्या मोनफिल्सने पराभूत केले. मोनफिल्सने हा सामना 4-6, 6-3, 6-1 असा जिंकून शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले. या पराभवामुळे मेदवेदेव्ह मानांकनातील आपले अग्रस्थान गमविणार असून येत्या सोमवारी जाहीर होणाऱया ताज्या एटीपी मानांकन यादीत सर्बियाचा जोकोविच पुन्हा अग्रस्थान पटकावणार आहे.









