किर्गीओस, रुबलेव्ह, सिनर, रॅडुकानू, कोन्टावेट यांचेही विजय, स्टीफेन्सचा पराभव
वृत्तसंस्था/ मेलबर्न
जागतिक द्वितीय मानांकित रशियाचा डॅनिल मेदवेदेव्ह, ब्रिटनचा अँडी मरे, आंद्रे रुबलेव्ह, यानिक सिनर, ऑस्ट्रेलियाचा किर्गीओस, आर्यना साबालेन्का, सिमोना हॅलेप, ऍनेट कोन्टावेट, ब्रिटनची एम्मा रॅडुकानू यांनी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीत स्थान मिळविले. अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठलेली लैला फर्नांडेझ, अमेरिकेची स्लोअन स्टीफेन्स यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
मेदवेदेव्हने सुमारे दोन तासांच्या लढतीत स्वित्झर्लंडच्या हेन्री लार्कसोनेनचा 6-1, 6-4, 7-6 (7-3) असा पराभव केला. अमेरिकन ओपनच्या जेतेपदानंतर त्याचा हा ग्रँडस्लॅममधील पहिलाच विजय होता. माजी अग्रमानांकित अँडी मरेने गेल्या पाच वर्षात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पहिला विजय नोंदवताना 21 व्या मानांकित निकोलोझ बेसिलाश्विलीवर 6-1, 3-6, 6-4, 6-7 (5-7), 6-4 अशी संघर्षपूर्ण मात केली. आठवडाभरात मरेने निकोलोझवर मिळविलेला हा दुसरा विजय आहे. मागील आठवडय़ात सिडनी क्लासिकमध्येही मरेने त्याला हरविले होते. जागतिक सहाव्या मानांकित रुबलेव्हने इटलीच्या जियान्लुका मॅगरचा 6-3, 6-2, 6-2 असा सहज पराभव केला तर जागतिक अग्रमानांकित यानिक सिनरने पोर्तुगालच्या जोआव सौसाववर 6-4, 7-5, 6-1 अशी मात करून दुसरी फेरी गाठली. अन्य एका सामन्यात कोविडमधून बरा झालेल्या निक किर्गीओसने दुसरी फेरी गाठताना ब्रिटनच्या लियाम ब्रॉडीचा 6-4, 6-4, 6-3 असा पराभव केला. दुसऱया फेरीत त्याची लढत संभाव्य विजेता मानल्या जाणाऱया मेदवेदेव्हशी होणार आहे.
साबालेन्का, हॅलेपचा संघर्ष

महिला एकेरीत जागतिक दुसऱया मानांकित साबालेन्काला एका सेटची पिछाडी भरून काढत स्टॉर्म सँडर्सवर 5-7, 6-3, 6-2 अशी मात करीत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. सिडनी व ऍडलेडमधील स्पर्धांत साबालेन्काला सुरुवातीलाच पराभव स्वीकारावे लागले होते. पण येथे तिने सुधारित कामगिरी करीत आगेकूच केली. रोमानियाच्या चौदाव्या मानांकित सिमोना हॅलेपलाही अनेक चुका झाल्याने विजयासाठी संघर्ष करावा लागला. तिने पोलंडच्या मॅग्डालेना प्रेंचचा 6-4, 6-3 असा पराभव केला. इस्टोनियाच्या सहाव्या मानांकित ऍनेट कोन्टावेटने झेकच्या कॅटरिना सिनियाकोव्हाला 6-2, 6-3 असे हरविले. 2020 मध्ये कोन्टावेटने येथील स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.
अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठलेल्या लैला फर्नांडेझला मात्र स्थानिक वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या मॅडिसन इनग्लिसकडून 4-6, 2-6 असा पराभवाचा धक्का बसला. यापूर्वी दोनदा फर्नांडेझने पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले होते. अन्य एका सामन्यात ब्रिटनच्या एम्मा रॅडुकानूने अमेरिकेच्या स्लोअन स्टीफेन्सचे आव्हान 6-0, 2-6, 6-1 असे संपुष्टात आणत पहिला अडथळा पार केला. पुढील फेरीत तिची लढत माँटेनेग्रोच्या डंका कोविनिकशी होणार आहे. स्टीफेन्स ही 2017 मधील अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेती आहे. पण या सामन्यात तिला सूर सापडला नाही.









