फेडरर, बेरेटिनी, क्रेज्सिकोव्हा यांचीही आगेकूच, किर्गीओसची माघार, ओस्टापेन्को स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ विम्बल्डन
द्वितीय मानांकित रशियाचा डॅनील मेदवेदेव्ह, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, इटलीचे मॅटेव बेरेटिनी व लाँरेन्झो सोनेगो, ऑस्ट्रेलियाची अग्रमानांकित ऍश्ले बार्टी, बार्बरा क्रेज्सिकोव्हा, अमेरिकेची कोको गॉफ, ब्रिटनची एम्मा रॅडुकानू, ऑस्ट्रेलियाची ऍला टोमलानोविक यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेची चौथी फेरी गाठली तर एलेना ओस्टापेन्कोचे आव्हान संपुष्टात आले आणि ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओसने तिसऱया फेरीतील दुसऱया सेटनंतर माघार घेतली.
रशियाच्या मेदवेदेव्हने पहिले दोन सेट्स गमविल्यानंतरही जोरदार मुसंडी मारत नंतरचे तीन सेट्स जिंकून 2017 चा उपविजेता मारिन सिलिकवर मात केली. त्याने ही संघर्षपूर्ण लढत 6-7 (3-7), 3-6, 6-3, 6-3, 6-2 अशी जिंकली. त्याची पुढील लढत पोलंडच्या 14 व्या मानांकित हय़ुबर्ट हुरकाजशी होणार आहे. दोन सेट्स गमविल्यानंतरही सामना जिंकण्याची मेदवेदेव्हची ही पहिलीच वेळ आहे. ‘विम्बल्डनमधील हा पहिलाच असा विजय आहे, ज्यात दोन सेट्स मी पिछाडीवर पडूनही जिंकलो. यापूर्वीही दोनदा मी पिछाडीवर पडलो. पण त्यावेळी मी दोन्ही सामने गमविले होते. मात्र यावेळी त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही, असा मी निर्धार केला होता,’ असे मेदवेदेव्ह नंतर म्हणाला. 32 व्या मानांकित सिलिकला दोन सेटची आघाडी टिकविता आली नाही आणि त्याच्याकडून 68 चुका झाल्या. 40 वर्षीय फेडररने कारकिर्दीत 18 व्या वेळी विम्बल्डनची चौथी फेरी गाठली असून त्याने ब्रिटनच्या कॅमेरॉन नोरीवर चार सेट्समध्ये 6-4, 6-4, 5-7, 6-4 असा विजय मिळविला. ग्रँडस्लॅमच्या चौथ्या फेरीत खेळण्याची त्याची ही एकंदर 69 वी वेळ असेल. चौथी फेरी गाठणारा तो तिसरा वयस्कर खेळाडू आहे. यापूर्वी 1969 मध्ये पांचो गोन्झालेझ (वय 41) व 1975 मध्ये केन रोजवाल (वय 40) यांनी असा पराक्रम केला होता. इटलीच्या लॉरेन्झो सोनेगोशी त्याची पुढील लढत होईल.

किर्गीओसची माघार
इटलीच्या सातव्या मानांकित मॅटेव बेरेटिनीने स्लोव्हेनियाच्या ऍलाझ बेडेनेनेवर 6-4, 6-4, 6-4 अशी मात केली तर त्याचाच देशवासी 23 वा मानांकित लॉरेन्झो सोनेगोने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थवर 6-3, 6-4, 6-4 अशी मात केली. इटलीच्या दोन खेळाडूंनी या स्पर्धेची चौथी फेरी गाठण्याची ही तिसरी ावेळ आहे. अन्य एका सामन्यात किर्गीओसला पोटदुखीमुळे तिसऱया फेरीतूनच माघार घ्यावी लागली. कॅनडाच्या फेलिक्स ऑगर ऍलियासिमेविरुद्ध त्याने पहिला सेट 6-2, असा जिंकल्यानंतर दुसरा सेट 6-1 असा गमविला. पण नंतर त्याने माघार घेत असल्याचे जाहीर केले.
बार्टी, एम्माची आगेकूच, ओस्टापेन्को पराभूत
महिला एकेरीत ऍश्ले बार्टीने चौथी फेरी गाठताना झेकच्या कॅटरिना सिनियाकोव्हाचा 6-3, 7-5 असा पराभव केला. तिची पुढील लढत पेंच स्पर्धा विजेत्या बार्बरा पेज्सिकोव्हाशी होईल. प्रेज्सिकोव्हाने पावल्युचेन्कोव्हाला हरवून आगेकूच केली आहे. बार्टीला या स्पर्धेत याआधी चौथ्या फेरीच्या पुढे मजल मारता आलेली नाही. फॉर्ममध्ये असलेल्या ओस्टापेन्कोला मात्र तिसऱया फेरीतच स्पर्धेबाहेर पडावे लागले. तिला ऑस्ट्रेलियाच्या ऍला टोमलानोविकने 4-6, 6-4, 6-2 असे नमविले. निर्णायक सेटमध्ये 0-4 असे पिछाडीवर पडली असताना ओस्टापेन्कोने मेडिकल ब्रेक घेतला, त्यावेळी टोमलानोविक खूपच संतापली. आपली लय बिघडवण्यासाठीच तिने दुखापतीचे नाटक केल्याचे ती म्हणाली आणि तिने पंचांकडे तशी तक्रारही केली होती. सामना संपल्यानंतरही दोघींत शाब्दिक चकमक सुरूच होती. ओस्टापेन्कोने या स्पर्धेआधी ईस्टबोर्न ग्रासकोर्ट स्पर्धा जिंकली होती. पण येथे तिला तो जोम टिकविता आला नाही. टोमलानोविकची लढत ब्रिटनच्या युवा वाईल्डकार्डधारक एम्मा रॅडुकानूशी होणार आहे. विम्बल्डनमध्ये पदार्पण करणाऱया 18 वर्षीय एम्माने सनसनाटी खेळ करीत सलग आठ गेम्स जिंकून सोराना सिर्स्टियाचे आव्हान 6-3, 7-5 असे संपुष्टात आणले. जागतिक क्रमवारीत ती 338 व्या स्थानावर आहे. अमेरिकेच्या 17 वर्षीय कोको गॉफनेही चौथ्या फेरीत प्रवेश करताना काया जुवानचा 6-3, 6-3 असा पराभव केला. तिची लढत जर्मनीच्या अँजेलिक केर्बरशी होणार आहे.
बॉक्स (फोटो-4 एसपीओ 08-दिविज शरण-सामंथा मरे)
दिविज शरण-सामंथा मरे स्पर्धेत खेळणारे 30 वर्षातील पहिले जोडपे
दिविज शरण, सामंथा मरे हे विम्बल्डनमध्ये खेळणारे गेल्या 30 वर्षातील पहिले जोडपे बनले आहे. नऊ वर्षांपूर्वी दोघे पहिल्यांदा एकत्र आले होते. त्यानंतर सात वर्षांनी दोघे विवाहबद्ध झाले आणि यावेळी विम्बल्डनमध्ये मिश्र दुहेरीत एकत्र खेळण्याचा निर्णय घेतला. 1968 मध्ये या स्पर्धेत तब्बल 13 विवाहित जोडप्यांनी भाग घेतला होता. जिमी कॉनर्स व ख्रिस एव्हर्ट यांनी 1974 मध्ये भाग घेतला होता, त्यावेळी त्यांची एंगेजमेंट झाली होती. ऑस्टियाचा जुर्गेन मेल्झर व झेकची इव्हेटा बेनेसोव्हा यांनी ही स्पर्धा 2011 मध्ये जिंकली होती. पण त्यानंतर एक वर्षाने त्यांनी लग्न केले होते. दिविज-सामंथा यांनी येथील पहिल्या सामन्यात एरियल बेहर व गॅलिना वोस्कोपबोएव्हा यांच्यावर 6-3, 5-7, 6-4 अशी मात करून दुसरी फेरी गाठली.
बॉक्स
सानिया मिर्झा-बेथनी मॅटेक सँड्सचे महिला दुहेरीतील आव्हान समाप्त
भारताची सानिया मिर्झा व तिची अमेरिकन साथीदार बेथनी मॅटेक सँड्स यांना महिला दुहेरीच्या दुसऱया फेरीत पराभवाचा धक्का बसला. सानिया-बेथनी यांना रशियाच्या इलेना व्हेस्निना व व्हेरोनिया कुडरमेटोव्हा यांच्याकडून 4-6, 3-6 असा पराभव स्वीकारावा लागला. सुमारे दीड तास ही लढत चालली होती. मिश्र दुहेरीत सानिया रोहन बोपण्णासमवेत दुसरी फेरी गाठली आहे.









