आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मानले आभार : आमदार शिवेंद्रराजे भोसले, उपमुख्यमंत्री अजित पवार फोटो
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिह्याच्यादृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या मेडीकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लावण्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना यश आले आहे. नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनात शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून सातारा जिह्याचा मेडीकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी वाढीव जागा हस्तांतरणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरुन अजितदादांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वाढीव 60 एकर जागा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी 61 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे जिल्हावासियांच्यावतीने आभार मानले.
राज्य मंत्रीमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर लगेचच विकासकामे मंजूरीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पाठपुरावा सुरु केला होता. नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनादरम्यान शिवेंद्रसिंहराजेंनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी विविध विकासकामांबरोबरच सातारा जिह्याचा महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या मेडीकल कॉलेज लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी अजितदादांकडे केली. यानंतर अजितदादांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱयांची बैठक घेतली. या बैठकीला आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह पालकमंत्री पाटील उपस्थित होते. बैठकीत चर्चा होवून नेमका विषय काय आहे, याची माहिती पवार यांनी घेतली. कृष्णानगर येथील कृष्णा खोरे विभागाची 25 एकर जागा मेडीकल कॉलेजसाठी यापुर्वी अधिग्रहीत करण्यात आली होती. उर्वरित 60 एकर जागा हस्तांतरीत करण्याचा निर्णय प्रलंबित होता. ही जागा तातडीने हस्तांतरीत करण्यात यावी. त्यासाठीच्या प्रशासकीय बाबी पूर्ण कराव्यात आणि मेडीकल कॉलेज उभारणीस प्रारंभ होण्यासाठी तातडीने निधीची तरतूद करावी तसेच कॉलेज प्रवेश प्रक्रीया सुरु करावी अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.
यानंतर अजितदादांनी तातडीने वाढीव 60 एकर जागा मेडीकल कॉलेजसाठी हस्तांतरीत करण्याचे आदेश अधिकाऱयांना दिले. मेडीकल कॉलेजसाठी वैद्यकीय शिक्षणमधून 61 कोटी रुपये निधीची तरतूद उपमुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार करण्यात आली आहे. दरम्यान, मेडीकल कॉलेज नाशिक विद्यापिठाला संलग्नग्न करण्याचा निर्णयही झाला असून आता नॅशनल मेडीकल कमिशनमार्फत येत्या 15 दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करण्यात येवून पुढील कार्यवाही सुरु होणार आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून मेडीकल कॉलेजचा जागेचा प्रश्न अखेर सुटला असून जिह्यातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग खुला झाला आहे. सातारा जिह्याचा महत्वाचा आणि गरजेचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे जिल्हावासियांच्यावतीने आभार मानले आहेत.









